Stock Market Closing Bell | घसरणीला ब्रेक, सेन्सेक्स ४०५ अंकांनी वाढून बंद, ‘हे’ शेअर्स तेजीत? | पुढारी

Stock Market Closing Bell | घसरणीला ब्रेक, सेन्सेक्स ४०५ अंकांनी वाढून बंद, 'हे' शेअर्स तेजीत?

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील सुधारणांमुळे दोन दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी भारतीय शेअर बाजारात तेजी परतली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स सुमारे ५०० अंकांनी वाढून ६५,७५० च्या वर गेला. तर निफ्टी १९,५५० च्या वर राहिला. त्यानंतर सेन्सेक्स ४०५ अंकांच्या वाढीसह ६५,६३१ वर बंद झाला. तर निफ्टी १०९ अंकांच्या वाढीसह १९,५४५ वर स्थिरावला.

संबंधित बातम्या

आज ऑटो, आयटी आणि कॅपिटल्स गुड्स स्टॉक्स चमकले. क्षेत्रीय पातळीवर ऑटो, बँक, आयटी आणि कॅपिटल गुड्स ०.५-१ टक्क्यांनी वाढले. तर फार्मा, पॉवर आणि पीएसयू बँकिंगमध्ये विक्री दिसून आली. बीएसई मिडकॅप निर्देशांक बंद होताना सपाट झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.६ टक्क्यांनी वाढला.

सेन्सेक्सवर (Sensex Today) एलटीचा शेअर २.५७ टक्क्यांनी वाढून ३,१०३ रुपयांवर पोहोचला. टीसीएस, इन्फोसिस, टायटन, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, टाटा मोटर्स, एम अँड एम हे शेअर्स सुमारे १ टक्क्यांहून अधिक वाढले. अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, कोटक बँक, मारुती या शेअर्सनीही हिरव्या चिन्हात व्यवहार केला. तर पॉवर ग्रिड, एनटीपीसी, सन फार्मा, एचसीएल टेक या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

निफ्टी ५० वर एलटी, टीसीएस, टायटन, इन्फोसिस, एशियन पेंट्स हे टॉप गेनर्स राहिले. तर पॉवर ग्रिड, हिंदाल्को, सन फार्मा, एनटीपीसी हे घसरले.

तेल कंपन्यांचे शेअर्स वधारले, ‘हे’ ठरले कारण?

कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने तेल विपणन कंपन्यांचे (OMCs) शेअर्स आज बीएसईवर गुरुवारच्या व्यवहारात ४ टक्क्यांनी वाढले. आजच्या व्यवहारात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) चे शेअर्स सर्वाधिक वाढले. हा शेअर ४ टक्क्यांनी वाढून २६० रुपयांवर गेला. त्यानंतर हा शेअर २५२ रुपयांवर स्थिरावला. तर, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) चे शेअर्स सुमारे २ टक्क्यांनी वाढले.

आशियाई बाजार

जपानचा निक्केई निर्देशांक पाच दिवसांच्या घसरणीनंतर आज वाढला. निक्केई आज १.८० टक्के वाढून ३१,०७५ वर बंद झाला. तर टॉपिक्स निर्देशांक १.९९ टक्क्यांनी वाढून २,२६३.०९ वर पोहोचला. यूएस ट्रेझरी उत्पन्न १६ वर्षांच्या शिखरावरून कमी झाले आहे. यामुळे आशियाई बाजारात तेजी दिसून आली. अमेरिकेतील शेअर बाजारात काल तेजी राहिली होती. नॅस्डॅक निर्देशांक सुमारे १ टक्क्यांनी वाढला. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज (Dow Jones Industrial Average) ०.४ टक्के आणि एस अँड पी ५०० निर्देशांक (S&P 500) ०.८ टक्क्यांनी वधारला.

११ सत्रांत केवळ विक्रीच

परदेशी गुंतवणूकदारांची (Foreign institutional investors) भारतीय बाजारात गेल्या ११ सत्रांपासून विक्री सुरुच आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी ४,४२४ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केले. पाच आठवड्यांतील हा सर्वाधिक विक्रीचा आकडा आहे.

तेलाचा परिणाम

OPEC+ पॅनेलने पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तेल उत्पादनात कपात केल्यामुळे गुरुवारी तेलाच्या किमती वाढल्या. ब्रेंट क्रूड ऑइल फ्यूचर्सचा दर ६३ सेंटने वाढून प्रति बॅरल ८६.४४ डॉलरवर गेला. तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड (WTI) ४९ सेंटने वाढून ८४.७१ डॉलरवर पोहोचले.

हे ही वाचा :

Back to top button