आयकर : सतत जॉब बदलताय, आयटीआर भरताना काय काळजी घ्यावी? | पुढारी

आयकर : सतत जॉब बदलताय, आयटीआर भरताना काय काळजी घ्यावी?

मेघना ठक्कर

हल्लीच्या काळात नोकर्‍या बदलणार्‍यांची संख्या मोठी आहे. एकाच आर्थिक वर्षात दोन ते तीन नोकर्‍या बदलणारेही काही जण अवतीभवती दिसतात. हा व्यक्तिसापेक्ष मुद्दा असला तरी अशा व्यक्तींनी आयटीआर भरताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक ठरते.

गुंतवणुकीची कागदपत्रे तयार ठेवा

अगोदरची कंपनी, वेतन आणि टीडीएसचे आकलन हे आपल्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला गुंतवणुकीच्या घोषणेच्या आधारावर करण्यात येते. जर आपण नव्या कंपनीकडून मिळणार्‍या वेतनाची माहिती दिली नाही, तर नवीन कंपनी कराची आकारणी शिल्लक राहिलेल्या महिन्यानुसार करते. अर्थात, अनेक प्रकरणांत ही बाब पुरेशी ठरत नाही. मात्र आपण प्राप्तिकर कलम 80 सी नुसार, कमाल गुंतवणूक केली असेल आणि कंपनीला कमी रक्कम सांगत असेल, तर त्यापासून वाचण्यासाठी प्राप्तिकर विवरण दाखल करताना गुंतवणुकीची संपूर्ण कागदपत्रे तयार ठेवा.

फॉर्म 16 घेण्यास विसरू नका

साधारणपणे नोकरी बदलण्याच्या नादात बहुतांश कर्मचारी पूर्वीच्या कंपनीतील फॉर्म 16 घेण्यास विसरतात. त्याचवेळी आयटीआर भरण्याची वेळे येते तेव्हा जुन्या कंपनीच्या फॉर्म 16 ची आठवण येते. फॉर्म 16 नसल्याने कराचे आकलन योग्य रितीने करता येत नाही. जर आपण नोकरी बदलली असेल आणि फॉर्म 16 घेण्याचे विसरला असाल, तर आयटीआर भरताना अडचणी येऊ शकतात. अर्थात, या समस्येवरदेखील मार्ग आहे. आपण कराचे आकलन सहजपणे करू शकता. यासाठी प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म 26 एएस डाऊनलोड करावे. या अर्जात आपल्या बँक खात्यात आलेला पैसा आणि त्यावरचा कर, याची एकत्र गोळाबेरीज करून करकपातीची योग्य आकडेमोड करू शकता.

असे करा कराचे आकलन

कराचे आकलन करताना जुन्या कंपनीचे एक्स महिन्यात मिळालेले वेतन आणि नव्या कंपनीचे वाय महिन्यात मिळालेल्या वेतनाला जोडा. त्यानंतर आपण 80 सी मध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेला जोडा. त्यानंतर दोन्ही कंपनींकडून कपात केेलेल्या करांना एकत्र करा. त्यानंतर प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन कराची आकडेमोड करावी. जर आपल्यावर मागील काही कर असेल, तर प्राप्तिकर विवरण भरण्यापूर्वी तो कर भरावा. यानुसार आपण योग्य रितीने आयटीआर दाखल करू शकता.

भविष्य निधीच्या खात्यातील रक्कम आपल्या वेतनाचा एक भाग निवृत्त फंडात दर महिने जमा होतो. कंपनीदेखील आपल्याकडून एक वाटा जमा करत असते. जर आपण नोकरी बदलत असाल, तर हा पैसा काढणे किंवा ट्रान्स्फर करण्याचा पर्याय असतो. जर सलग पाच वर्षांपर्यंत सेवा केली, तर पैसे काढणे करपात्र राहू शकते. भविष्य निधीत जमा झालेला पैसा करमुक्त असतो. भविष्य निधीत जमा होणारा पैसा ट्रान्सफर करण्यासाठी फॉर्म 10 सी आणि फॉर्म 19 भरा.

Back to top button