नाशिक क्राईम : शहरातील ७५ टक्के घरफोड्या गुलदस्त्यात | पुढारी

नाशिक क्राईम : शहरातील ७५ टक्के घरफोड्या गुलदस्त्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांनुसार जानेवारी २०१७ पासून घरफोडीचे १ हजार ७५४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी अवघ्या २५ टक्के म्हणजे ४३७ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. तर ७५ टक्के गुन्ह्यांची उकल होणे बाकी असून, त्यातील कोट्यवधी रुपयांचा किमती ऐवज अद्यापही चोरट्यांच्याच ताब्यात आहे.

संबधित बातम्या :

शहरातील लोकसंख्या वाढल्यानंतर येथील निवासस्थान, व्यावसायिकांची संख्याही वाढली आहे. त्या तुलनेने शहरातील पोलिसांचे मनुष्यबळ जैसे थे आहे. त्यामुळे आहे त्या पोलिसांच्या बळावर शहराची सुरक्षितता राखली जात आहे. त्याचा फटका गुन्हे उकल करण्यास होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, शहरात २०१७ पासून चोरट्यांनी जबरी चोरी, चोरी, घरफोडी आदी गुन्हे करीत नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचा ऐवज चोरला आहे. त्यापैकी काही गुन्हे उघडकीस आणण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. त्यानुसार चोरट्यांची धरपकड करून नागरिकांचा किमती ऐवज हस्तगत केला आहे.

रात्री सर्वाधिक घरफोडी

शहरात दिवसा आणि रात्री घरफोडीचे प्रकार घडले आहेत. त्यापैकी ३०७ घरफोड्या या दिवसा झाल्या आहेत. तर १ हजार ४४७ घरफोडीचे गुन्हे रात्रीच्या सुमारास झाल्या आहेत. बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

वर्ष —- दाखल गुन्हे —- उकल

२०१७ —- ३१९ —- ८६

२०१८ —- २५५ —- ८४

२०१९ —- २८५ —- ५९

२०२० —- २४२ —- ५८

२०२१ —- २१० —- ५३

२०२२ —- २५२ —- ६६

२०२३ —- १९१ —- ३१

हेही वाचा :

Back to top button