Pune Crime News : आखाती देशात पुण्यातील महिलांची विक्री करणाऱ्या दलालास अटक | पुढारी

Pune Crime News : आखाती देशात पुण्यातील महिलांची विक्री करणाऱ्या दलालास अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नोकरीच्या आमिषाने पुण्यातील तीन महिलांना आखाती देशात नेवून तेथे त्यांना डांबून ठेवत त्यांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मुंबईतील माहीममधून दलालास अटक केली. याबाबत मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद फैय्याज अहमद याहया (28, रा. ओशिवरा. मूळ रा. कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत दोन महिलांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

फिर्यादी महिला मार्केटयार्ड परिसरात वास्तव्यास आहेत. चंदननगर भागातील एका महिलेने आखाती देशात सफाई कामाची नोकरी आहे, दरमहा 35 ते 40 हजार रुपये वेतन मिळेल, असे महिलांना सांगितले होते. फिर्यादी महिलांनी मुंबईतील दलाल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सौदी अरेबियातील रियाध शहरातील एका अरबी व्यक्तीकडे त्यांना साफसफाईचे काम मिळवून दिले होते.

मात्र, अरबी व्यक्तीने त्यांचा छळ सुरू केला. दलालांनी महिलांची सौदी अरेबियातील व्यक्तीला चार लाख रुपयांत विक्री केली होती. याबाबत दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी हा मुंबईत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे, अंमलदार तुषार भिवकर, अमित जमदाडे यांचे पथक मुंबईला रवाना झाले. तांत्रिक तपासावरून पोलिसांनी आरोपी याहया याला ताब्यात घेतले.

गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश माळेगावे, अंमलदार राजेंद्र कुमावत, तुषार भिवरकर, अमित जमदाडे, मनीषा पुकाळे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

माहीम येथून आरोपीला अटक

फरार आरोपी अब्दुल हमीद शेख हा दुबई आखाती देशातील नोकरीच्या आमिषाने आकर्षित करायचा. त्यानंतर याहया हा पुढील प्रक्रिया पार पाडत असे. त्यामध्ये त्याला त्याचे काही साथीदार मदत करत असत. इंग्रजी आणि अरबी भाषेवर त्याचे प्रभुत्व आहे. तोच महिलांना तेथेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व प्रक्रिया पार पाडत होता. त्याचे कार्यालय माहीम येथे आहे. तेथूनच पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली.

हेही वाचा

मुंबई : गणेश विसर्जनाला ५५ देशांच्या राजदूतांची उपस्थिती असणार

जपून ! नगरमध्ये रात्री नऊनंतर रस्त्यांवर असते कुत्र्यांचीच दहशत

Pune News : अर्जांचा निपटारा करा; अतिरिक्त आयुक्तांचे आदेश; सेवा महिन्याचे आयोजन

Back to top button