नाशिकमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; धार्मिक, वैज्ञानिक देखाव्यांचे आकर्षण | पुढारी

नाशिकमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; धार्मिक, वैज्ञानिक देखाव्यांचे आकर्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सर्वांच्याच लाडक्या बाप्पाचे आगमन झाल्यानंतर सार्वजनिक मंडळातील बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांमध्ये प्रचंड आतुरता दिसून येत आहे. यंदाचे देखावे बघण्यासारखे असून, त्यामध्ये चांद्रयान-३ या देखाव्यासह धार्मिक आणि समाजप्रबोधन करणाऱ्या देखाव्यांचे आकर्षण आहे. शेवटच्या दिवशी देखावे बघण्यासाठी भक्तांची गर्दी उसळणार असली तरी, यंदा दुसऱ्या दिवसापासूनच देखावे बघण्यासाठी गर्दी होत आहे.

संबधित बातम्या :

दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक, प्रबोधनात्मक अशा विविध विषयांवरील देखावे सादर करण्यावर मंडळांनी भर दिला आहे. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्‍नही या माध्यमातून मांडले जातात. वारकऱ्यांचा देखावादेखील आकर्षण ठरत आहे. यंदा सर्वाधिक आकर्षण ‘चांद्रयान-३’ या देखाव्याचे असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने चांद्रयान-३ ही मोहीम यशस्वी पार पाडली. हा संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. याच क्षणाच्या आठवणी उभ्या करण्याचा प्रयत्न चांद्रयान-३ या देखाव्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे. हा देखाव्याची भक्तांमध्ये प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. तसेच धार्मिक देखाव्यांमध्ये ‘प्रति केदारनाथ’ हा देखावादेखील भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहे. नाशिकरोड, अशोकस्तंभासह इतर परिसरातील गणेश मंडळांनी प्रतिकेदारनाथचा देखावा सादर केला आहे. त्याचबरोबर पांडुरंग अर्थात विठ्ठल, कृष्णाची भव्य प्रतिमादेखील भक्तांसाठी आकर्षण ठरत आहे. कॉलेजरोड परिसरातील एका गणेश मंडळाकडून कृष्णाची प्रतिमा साकारली आहे.

तसेच चलतचित्र, प्रबोधनात्मक देखावेदेखील साकारण्यात आले आहेत. राज्य शासनाने ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ या विषयाअंतर्गत गणेश मंडळांसाठी स्पर्धेचे आयोजन केल्याने, या स्पर्धेत अनेकांनी सहभाग नोंदविण्यासाठी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यावर भर दिला आहे. दरम्यान, अखेरच्या दोन दिवसांत देखावे बघण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होणार असल्याने, मंडळाच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांकडून त्याबाबतचे नियोजन केले जात आहे.

शिवराज्याभिषेक देखाव्याचे आकर्षण

यंदा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्षे आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगासह छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम उलगडणारे देखावेही यंदा साकारण्यात येत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक चित्रपटांमधील योद्ध्यांची कामगिरी देखाव्यात पाहता येणार आहे. मागील काही महिन्यांतील राज्यातील घडामोडींचे प्रतिबिंबही देखाव्यात दिसून येत आहे.

हेही वाचा : 

Back to top button