काळजी घ्या ! रक्तदाब, मधुमेहासह मानसिक रुग्ण वाढले | पुढारी

काळजी घ्या ! रक्तदाब, मधुमेहासह मानसिक रुग्ण वाढले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  केंद्राच्या मार्गदर्शनात असंसर्गिक रोगनियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. यात सध्याच्या मृत्यूपैकी तब्बल 63 टक्के मृत्यू हे असंसर्गजन्य आजारातून झाल्याचा अहवाल पुढे आला आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, मानसिक तणाव, व्यसनाधीनतेच्या आढळलेल्या रुग्णांची संख्या चिंताजनक असल्याचे दिसत आहे.
एन.सी.डी. या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्हाभर नागरिकांची नोंदणी, चाळणी तपासणी व उपचार हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्यासाठी जिल्हा समन्वयक म्हणून डॉ. सुरेश घोलप व त्यांची टीम काम पाहत आहे.

संबंधित बातम्या :

जिल्ह्यात 13 लाख नागरिकांची तपासणी
जिल्ह्याची लोकसंख्या साधारणतः 45 लाख आहे. यातील 36 लाख 30 हजार 542 लोक ग्रामीण भागात राहतात. यापैकी 30 वर्षांवरील 30 लाख 61 हजार 482 लोकांची आशा सेविकांच्या माध्यमातून नोंदणी आणि आतापर्यंत 13 लाख 23 हजार 642 नागरिकांची चाळणी तपासणी करण्यात आली. त्यात धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे.

बदलती लाईफस्टाईल, व्यसनाधीनता, ताणतणाव आणि विशेषतः तरुणांमध्ये मोबाईल, सॉफ्टवेअरच्या अतिरेकामुळे मानसिक आजार बळावू शकतात. आयुष्यमान वाढल्यामुळे स्मृतिभ्रंशाचा प्रकारही चिंताजनक आहे. त्यामुळे स्वतःसाठी, कुटुंबासाठी वेळ द्या, व्यसने टाळा.
                                       – डॉ. कैलास झालाणी, मानसोपचार तज्ज्ञ

नागरिकांनी व्यसनापासून दूर राहावे, नियमित व्यायाम करावा, फास्ट फूड टाळावे, फळे-भाज्यांचे सेवन करावे, मानसिक तणावापासून स्वतःला दूर ठेवावे. आरोग्यदायी जीवनशैली जगण्याचा अवलंब करावा जेणेकरून विविधआजारांपासून स्वतःला दूर ठेवता येईल.
                                            -डॉ. सुरेश घोलप, जिल्हा समन्वयक

रक्तदाबाची कारणे
व्यसनाधीनता, मानसिक तणाव, रात्रीचे जागरण, आहारामध्ये चरबी, मिठाचे अतिप्रमाण, बेकरीच्या पदार्थांचे सेवन, व्यायामाचा अभाव, आनुवंशिकता इत्यादी.

मधुमेहाची कारणे
आनुवंशिकता, बैठे काम, व्यायामाचा अभाव, अतिप्रमाणात गोड पदार्थांचे सेवन, स्थूलता, मानसिक ताणतणाव, स्वादुपिंडाचे आजार, जन्मजात.
तोंडाच्या कर्करोगाची कारणे
व्यसनाधीनता, यात सर्वांत जास्त रुग्ण तंबाखू खाणारे आहेत

Back to top button