हिंगोली: सेनगाव येथे धाब्यावर अवैध मद्यविक्री; चालकाला १ लाखाचा दंड | पुढारी

हिंगोली: सेनगाव येथे धाब्यावर अवैध मद्यविक्री; चालकाला १ लाखाचा दंड

सेनगाव, पुढारी वृत्तसेवा : येथील सातबारा नावाच्या धाब्यावर अवैध दारू विक्री सुरू असल्याने उपविभागीय अधिकारी यांनी ढाबा चालकाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील धाबा चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

येथील सातबारा धाब्यावर अवैधरित्या मद्यविक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यावरून उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार यांच्या पथकाने धाब्यावर छापा टाकला होता. या प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे बंधपत्र बाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावरून उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी धाबा चालक अमोल मोहोळे याच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे एक लाख रुपयांचे बंधपत्र घेतले होते.

त्यानंतरही धाब्यावर दारू विक्री सुरू होती. त्यानंतर पुन्हा उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणात बंधपत्राचे उल्लंघन केल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले. त्यावरून अमोल मोहोळे याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले आहेत. मोहळे याने नुकतीच दंडाची रक्कम शासन खाती जमा केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अठरा प्रकरणात 6.90 लाख रुपये किमतीचे बंधपत्र घेण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक ​​​​​​​आदित्य पवार यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button