हिंगोलीत अल्पवयीन मुलीवर पित्याचा अत्याचार; मुलीची प्रसूती झाल्यानंतर फुटले बिंग | पुढारी

हिंगोलीत अल्पवयीन मुलीवर पित्याचा अत्याचार; मुलीची प्रसूती झाल्यानंतर फुटले बिंग

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली तालुक्यात नराधम पित्यानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. जिवे मारण्याच्या धमकीने या प्रकाराची वाच्यता झाली नाही. मात्र मुलीची प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झाल्यानंतर या सर्व प्रकाराचे बिंग फुटले. पिडित मुलीच्या तक्रारीवरून पित्याविरुध्द बासंबा पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.११) रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.

हिंगोली तालुक्यातील एक कुटुंब मागील काही दिवसांपासून पुणे जिल्हयातील पिंपळगाव येथे काम करीत होते. यामध्ये १७ वर्षीय मुलगी व तिची आई व वडिल असे कुटुंब राहत होते. २१ डिसेंबर २०२२ रोजी मुलगी व तिचे कुटुंब झोपले असतांना तिच्या पित्याने मुलीस झोपेतून उठवून आई पासून बाजूला नेऊन तिच्यावर अत्याचार केला. सदर प्रकार कोणाला सांगितला तर जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्यानंतर वेळोवेळी तिच्यावर अत्याचार झाला. त्यामुळे ती गरोदर राहिली. या प्रकाराची माहिती तिच्या आईला मिळाल्यानंतर तिच्या आईने जाब विचारला. मात्र तिलाही जिवे मारण्याची धमकी दिली. मागील आठवड्यापासून हे कुटुंब दुसरीकडे राहू लागले होते.

त्यानंतर पिडित मुलीने शनिवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात एका मुलीला जन्म दिला. यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे बिंग फुटले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बासंबा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास चवळी, उपनिरीक्षक खरात, जमादार खंडेराय नरोटे यांच्या पथकाने रुग्णालयात जाऊन त्या मुलीची चौकशी केली. पिडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या पित्या विरुध्द अत्याचार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button