आत्तापर्यंत मराठीला अभिजात दर्जा न मिळण्यासाठी सारेच जबाबदार : डॉ. जोशी | पुढारी

आत्तापर्यंत मराठीला अभिजात दर्जा न मिळण्यासाठी सारेच जबाबदार : डॉ. जोशी

पुणे : पुढारी वृत्तसेवा: मराठी राज्यातच सध्या मराठीसमोर कधी नव्हे एवढी आव्हाने उभी आहेत. मात्र, आपले तथाकथित लेखक, कलावंत, विचारवंत, उच्चशिक्षित, व्यावसायिक त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून जबाबदारी मात्र टाळत आहेत. त्यामुळे मराठीच्या अभिजात दर्जाचा जो खेळखंडोबा झाला आहे, त्याला आपण सर्वजण तितकेच जबाबदार आहोत, असे मत ज्येष्ठ लेखक आणि मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचे प्रमुख संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले.

हे चित्र दक्षिणेतील भाषिक समाजात नाही. त्यामुळेच त्यांना अभिजात दर्जा मिळतो आणि मराठीला तो गेली दहा वर्षे देण्याचे टाळण्याची हिंमत केंद्र सरकार करू शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विश्व मराठी परिषदेतर्फे ‘मराठीच्या अभिजात दर्जाचा खेळखंडोबा’ या विषयावर डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते, त्या वेळी डॉ. जोशी बोलत होते. मराठी प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते.

जोशी म्हणाले, की मराठीची अवहेलना आणि दुरवस्था यासाठी केवळ राज्यकत्र्यांनाच तेवढा दोष देऊन चालणार नाही. तेदेखील स्वभाषेबद्दल घोर उदासीन असलेल्या मराठी भाषिक समाजाचाच भाग आहेत. भाषेचे शिक्षणच न देता भाषेच्या नावावर केवळ साहित्याचे शिक्षण देण्याचा आणि भाषिक, सांस्कृतिक आत्मसन्मान चळवळ न उभारण्याचाही हा परिणाम आहे. अभिजात दर्जासंदर्भात केंद्र सरकार, साहित्य अकादमी, संस्कृती मंत्रालय, संबंधित मंत्री हे प्रकरण अंतिम टप्प्यात असल्याचे सांगणारे नेते हे सारे मिळून मराठी भाषिक समाजाची केवळ दिशाभूल करत आहेत. केंद्र सरकारने मराठी भाषिकांच्या अस्मितेशी व भावनांशी खेळू नये. सूत्रसंचालन प्रा. अनिकेत पाटील यांनी केले.

हेही वाचा 

 

Back to top button