स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण : मुख्यमंत्री सदनातील आणखी एक व्हिडिओ समोर | पुढारी

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण : मुख्यमंत्री सदनातील आणखी एक व्हिडिओ समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावरील कथित हल्ल्याच्या संदर्भात सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सदनातील एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री सदनाच्या बाहेरील नवीन सीसीटीव्ही फुटेज शेअर केले असून मालीवाल यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे.

ठळक मुद्दे

  • स्वाती मालीवाल यांचा अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभवकुमार यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
  • पोलिसांनी मालीवाल यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री सदनात १३ मे रोजी घडलेल्या घटनेचे दृश्य पुन्हा तयार केले.
  • केजरीवाल यांना घेरण्यासाठी भाजपचा हा कट आहे, असा आरोप आपच्या नेत्या आतिशी यांनी केला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय आहे?

‘आप’ने व्हायरल केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मालीवाल या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सदनातून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यांना महिला सुरक्षा रक्षकांने पकडले आहे. फुटेजमध्ये मालीवाल या परिसराबाहेर सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद घालत असल्याचेही दिसते. मालीवाल रस्त्यावर येताच त्या महिला सुरक्षा कर्मचाऱ्याचे हात झटकतात. यादरम्यान तेथे दोन पोलिसही दिसतात. त्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे बोट दाखवत त्यांना काहीतरी बोलतात. मालीवाल यांनी मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये बदल केल्याचा आरोप केला आहे.

मालीवाल यांच्याकडूनच धमक्या, आपचा आरोप

स्वाती मालीवाल यांना अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभवकुमार यांनी मारहाण केल्याचे आरोप खोटे असून, हा भाजपचा कट असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे. दिल्ली सरकारच्या मंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला. त्या म्हणाल्या की, स्वाती मालीवाल यांनी तक्रारीमध्ये विभव कुमार यांच्यावर केलेले गंभीर आरोप निखालस खोटे आहेत. केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांना घेरण्यासाठी भाजपचा हा कट आहे. आज एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये मालीवाल ड्रॉईंग रूममध्ये आरामात बसलेल्या दिसत आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांना धमकावत असून, विभव कुमारला शिवीगाळ करत आहेत. त्याच्या अंगावर कोणतीही जखम दिसत नाही. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत.

विभव कुमार यांनी माझा शर्ट वर खेचला; मालीवाल यांची तक्रार

स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार यांनी मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. “मी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वाट पाहत असताना अचानक विभव कुमार तिथे आले. त्यांनी कोणतीही चर्चा न करता शिवीगाळ करण्यास सुरवात केली. शिवीगाळ केल्यानंतर ते थांबले नाहीत. त्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. जाणीवपूर्वक त्यांनी माझा शर्ट वर खेचला. एवढे सगळे होत असतानाही माझ्या मदतीला कोणीही आले नाही, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button