हिंगोली: लम्पीमुळे बैलपोळाच्या मिरवणुकीवर निर्बंध | पुढारी

हिंगोली: लम्पीमुळे बैलपोळाच्या मिरवणुकीवर निर्बंध

जवळाबाजार, पुढारी वृत्तसेवा: राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे गुरूवारी (दि.१४) साजरा होणारा बैलपोळा सण शेतकऱ्यांना घरीच साजरा करावा लागणार आहे. याबाबत प्रशासनाकडून आदेश काढण्यात आला आहे.

लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने बैलपोळाच्या मिरवणुकीवर निर्बंध आणले आहेत. बैलजोडीस एकत्र जमा होण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. तसेच बैलांची मिरवणूक काढता येणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना पोळा सण सार्वजनिक स्वरूपात साजरा करता येणार नाही. घरोघरीच बैलाची पूजा करून पोळा सण साजरा करता येणार आहे.

ग्रामीण भागात शेतकरी बांधव बैलजोडीस सजवून गावातील मुख्य मार्गाने वाजतगाजत मिरवणूक काढतात. त्यानंतर घरोघरी बैलजोडीची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. पण लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या सुचना पशुसंवर्धन विभागाने सर्व पशुपालक व शेतकऱ्यांना दिल्या आहेत. या रोगापासून बचाव करण्यासाठी जनावरांना लसीकरण करून घ्यावे. शेतकऱ्यांनी बैलपोळा यावर्षी घरोघरीच साजरा करावा, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा 

 

Back to top button