भटक्या कुत्र्यांसाठी हवी लसीकरण मोहीम | पुढारी

भटक्या कुत्र्यांसाठी हवी लसीकरण मोहीम

राजेंद्र खोमणे

नानगाव : अनेकदा लहान मुलांना पाळीव अगर भटकी कुत्री, मांजरे चावतात. याबाबत काहीजण घरी सांगतात, तर काही भीतीपोटी सांगत नाहीत. इंजेक्शन न घेतल्यास काही दिवसांनी रेबिजची लक्षणे आढळून येतात. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे रेबिजबद्दल जनजागृतीची गरज आहे. तसेच भटक्या कुर्त्यांसाठी लसीकरणाची मोहीम आखणे गरजेचे आहे.

दौंंड तालुक्याच्या ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांच्या सुळसुळाट झाला आहे. या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जनावरे जखमी होतात. अनेकदा नागरिकांचा चावा घेतल्याच्या घटना घडतात, त्यामुळे या भटक्या कुत्र्यांच्या सुळसुळाट थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

तालुक्यातील कोणत्याही गावात गेल्यास रस्त्यावर, गल्लीमध्ये, बाजारामध्ये, चौकांमध्ये भटक्या कुर्त्यांची टोळकी पाहावयास मिळतात. या कुर्त्यांबद्दल काहीही उपाययोजना केली जात नसल्यामुळे दिवसेंदिवस भटक्या कुर्त्यांची संख्या वाढत चालली आहे. त्याचा त्रास स्थानिक नागरिक, विद्यार्थी व वाहनचालकांना होत आहे. वाडीवस्त्यांंवरून सायकल, दुचाकी किंवा पायी येणा-यांना ही कुत्री लक्ष्य करतारत. काही ठिकाणी रस्त्यालगत नागरिक मृत जनावरे टाकतात. ती खाण्यासाठी भटकी कुत्री जमतात. त्याचादेखील त्रास नागरिकांना होतो.

ऑगस्टमध्ये 344 जणांचा चावा
प्राथमिक आरोग्य केंद्र नाव व संख्या पुढीलप्रमाणे : खामगाव (21), राहू (31), केडगाव (38), नानगाव (31), वरवंड (75), कुरकु़ंभ (53), रावणगाव (69), देऊळगाव राजे (37). दौंंड तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत भागात ऑगष्ट महिन्यात कुत्र्यांनी एकूण 344 नागरिकांचा चावा घेतला आहे.

गावातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी ही स्थानिक प्रशासनाची आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने विशेष मोहीम राबवली तर पंचायत समितीमार्फत सहकार्य करण्यात येईल. तसेच भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणाची मोहीम राबविण्यासाठी नियोजन केले जाईल.
                                        – अजिंक्य येळे, गटविकास अधिकारी, दौंंड.

ज्या नागरिकांकडे कुत्रे, मांजरे आहेत, त्यांनी आपल्या या पाळीव जनावरांचे आवर्जून लसीकरण घेणे गरजेचे आहे. वेळेवर लसीकरण केले तर पुढील धोका टळेल.
                                                          – अमोल ताकवणे, पारगाव सा.मा.

स्थानिक प्रशासनाने जबाबदारी घेतली व चांगल्या प्रशिक्षित टीमकडून भटक्या कुत्र्यांना व्यवस्थित पकडले; तर त्यांचे लसीकरण करता येईल.
                                 – डॉ. चैत्राली आव्हाड, पशुवैद्यकीय अधिकारी, केडगाव.

Back to top button