देगलूर पोटनिवडणूक : महाविकास आघाडीच्या एकजुटीचे यश, अशोक चव्हाण-खतगावकर ऐक्याला मतदारांचा कौल! | पुढारी

देगलूर पोटनिवडणूक : महाविकास आघाडीच्या एकजुटीचे यश, अशोक चव्हाण-खतगावकर ऐक्याला मतदारांचा कौल!

नांदेड : पुढारी वृत्तसेवा

देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मोठा विजय प्राप्त करून काँग्रेस पक्षाने आपली जागा राखली. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी येथे भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांचा 43 हजार 933 मतांनी पराभव केला. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी ही निवडणूक एकजुटीने लढवली. या निवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती होणार, असा दावा भाजपने केला होता. पण काँग्रेस नेते व ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांनी हा दावा मोडून काढताना या पक्षाचे स्थानिक कारभारी प्रताप पाटील-चिखलीकर आणि त्यांच्या चमूला सणसणीत चपराक लगावली. जो चिखलीकरांवर विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला, अशी पराभूत उमेदवार सुभाष साबणे यांची अवस्था आता झाली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर दुसर्‍या पक्षातील नेत्याला भाजपात घेऊन त्याची उमेदवारी लादण्याचा प्रयोग पहिल्यांदा बापूसाहेब गोरठेकर यांच्या बाबतीत 2019 मध्ये झाला होता; पण भोकरच्या मतदारांनी त्यांचा सपाटून पराभव केला. हेच गोरठेकर देगलूर पोटनिवडणुकीच्या काही दिवस आधी आपल्या मूळ पक्षात गेले. त्यावरून कोणताही बोध न घेता, भाजप नेत्यांनी शिवसेनेच्या साबणेंना पक्षप्रवेशापूर्वीच उमेदवारीची बक्षिसी दिली खरी; पण मतदारांना, विशेषतः शिवसैनिकांना हा प्रयोग रूचला नाही. त्यांनी साबणेंचाही गोरठेकर करून टाकला.

वरील प्रयोगाची नेपथ्यरचना खा. चिखलीकरांसह पदाधिकार्‍यांवर लादलेले संघटन सरचिटणीस गंगाधर यशवंत जोशी, लक्ष्मण गंगाराम ठक्करवाड यांनी साकारली होती. साबणे यांचे नाव त्यांनीच पक्षनेतृत्वाच्या गळी उतरविले होते. त्यामुळे या पराभवाची पूर्णतः जबाबदारी वरील तिघांवर येते. त्यामुळे पक्षाचा अत्यंत मानहानीकारक पराभव झाला आणि पक्षातील या तीन जणांच्या ‘ऑटोशाही’चा निषेध म्हणून खतगावकर यांच्यासारखा अनुभवी, संयमी आणि राजकीयदृष्ट्या मुरलेला नेताही भाजपला गमवावा लागला. हा पराभव देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांना बरेच इशारे देणाराही आहे.

काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनानंतर देगलूरमध्ये पोटनिवडणूक होणार, हे लक्षात घेऊन काँग्रेसने सहा महिन्यांपासून निवडणूक तयारी हाती घेतली. अंतापूरकर यांचे पुत्र जितेश यांना उमेदवारी देण्याचे तेव्हाच ठरले होते. हा नवा उमेदवार तसा नाममात्र होता. तेथे खरी प्रतिष्ठा पणाला लागली ती अशोक चव्हाण यांची. आ. अमरनाथ राजूरकर व डी. पी. सावंत यांच्यावर त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपविली होती; पण निर्णायकप्रसंगी भास्करराव खतगावकर, अविनाश घाटे प्रभुतींनी काँग्रेस प्रवेश करून अपेक्षित यशाचे मोठ्या विजयात रूपांतर केले.

खतगावकरांची हॅट्ट्रिक

देगलूर मतदारसंघात काँग्रेसचे जितेश अंतापूरकर मोठ्या मताधिक्याने जिंकले; पण यानिमित्ताने ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर यांनी एक ‘हॅट्ट्रिक’ नोंदविली. 2014 साली सुभाष साबणेंना निवडून आणण्यात त्यांचा थेट हातभार होता; पण त्याच साबणेंनी नंतर रंग बदलल्याने 2019 साली भास्कररावांनी शेवटच्या टप्प्यात आपली ‘व्होटबँक’ अंतापूरकरांच्या बाजूने वळवल्याच्या जुन्या नोंदी सापडतात आणि आता त्यांनी काँग्रेस प्रवेश करून जितेश यांच्या विजयात लक्षणीय योगदान देत हा प्रवेश सार्थकी लावला.

हे ही वाचा :

 

Back to top button