नवी दिल्ली/मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : लोकसभेच्या 3 पैकी दादरा-नगर हवेली ची जागा जिंकत शिवसेनेने प्रथमच महाराष्ट्राबाहेर भगवा फडकवला. 13 राज्यांतील 29 विधानसभा मतदार संघांत झालेल्या पोटनिवडणुकीतही विरोधकांनी व स्थानिक पक्षांनी भाजपला जोरदार टक्कर दिली.
मध्य प्रदेशात भाजपचा, तर हिमाचलमध्ये काँग्रेसचा वरचष्मा असून आसाममधील पाचही विधानसभा मतदार संघांतून भाजप आणि सहकारी पक्षांचा बंगालमधील दिनहाटा मतदारसंघात तृणमूलचा उमेदवार तब्बल 1 लाख 64 हजार मतांनी निवडून आलेला आहे. या विजयाने ममता बॅनर्जी यांची उंची आणखी वाढलेली आहे.
एकीकडे बंगाल हा तृणमूलचाच गड असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सिद्ध केले आहे, तर दुसरीकडे बिहारमध्ये जामिनावर सुटलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू यादव निष्प्रभ ठरले आहेत. बिहारमधील विधानसभेच्या दोन्ही जागांवर जदयूचे उमेदवार निवडून आले आहेत. कुशेश्वरस्थाननंतर तारापूरमध्येही जदयू उमेदवार राजीव कुमार सिंह जिंकले आहेत. कुशेश्वरस्थानमध्ये जदयूचे अमन हजारी यांचा विजय झाला आहे.
मध्य प्रदेशातील खांडवा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर पाटील निवडून आले आहेत. जोबट, पृथ्वीपूर विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार विजयी झाले आहेत. रैगांवमधून काँग्रेसला विजय मिळाला आहे. तब्बल 31 वर्षांनी या मतदारसंघातून काँग्रेसला यश आले आहे.
राजस्थानातील धारियावद आणि वल्लभनगर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत.
हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा जागेवर काँग्रेसच्या प्रतिभा सिंह यांनी भाजप उमेदवार तसेच निवृत्त लष्करी अधिकारी खुशहाल सिंह यांचा पराभव केला आहे. हिमाचलमधील तिन्ही विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप नेते तसेच राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी, महागाईमुळे असलेली जनतेची नाराजी, हे या पराभवाचे कारण असल्याचे सांगितले.
हरियाणात इनेलो प्रमुख ओम प्रकाश चौटाला यांचा मुलगा अभय चौटाला यांनी ऐलनाबाद विधानसभा निवडणुकीत सलग चौथ्यांदा विजय मिळवला आहे.
आंध्र प्रदेशातील बडवेलमधून वायएसआर काँग्रेस, तर तेलंगणातील हुजुराबादमधून टीएसआर सोडून भाजपमध्ये दाखल झालेले एटाला राजेंद्र जिंकले आहेत.
मेघालयमध्ये 'एनपीपी'ने 2 जागा जिंकल्या आहेत. एनपीपीचा घटक पक्ष यूडीपीने एका जागेवर विजय मिळवला आहे.
मिझोराममधील एकमेव जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंटचा विजय झाला आहे.
कर्नाटकमधील सिंदगी विधानसभा भाजपने, तर हंगल विधानसभा काँग्रेसने जिंकली आहे.
दादरा-नगर हवेली लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर 51 हजार 269 मतांनी विजयी झाल्या आहेत.