कधी कधी मैत्री जीवावर बेतते, अपहरण, खंडणी आणि ‘ती’चा खून | पुढारी

कधी कधी मैत्री जीवावर बेतते, अपहरण, खंडणी आणि 'ती'चा खून

अशोक मोराळे, पुणे

आजकाल कॉलेज, जॉब आणि व्यावसायाच्या निमित्ताने अनेकदा तरुण-तरुणींमध्ये मैत्री होते. मात्र आपण ज्याला मैत्री मानतो, ती खरेच मैत्री आहे का? याची खोलात जाऊन चौकशी करायला पाहिजे; अन्यथा कधी कधी अशी मैत्री जीवावर बेतते. अशाच एका घातक मैत्रीची ही कथा…

भाग्यश्री सुडे ही मूळची लातूर जिल्ह्यातील हरंगुळ बुद्रुक गावची. तिच्या कुटुंबातील एकुलती एक मुलगी. वडील गावचे माजी सरपंच, घरची परिस्थिती सधन. अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी ती पुण्यात आली होती. एका नामांकित कॉलेजमध्ये चौथ्या वर्षात शिक्षण घेत होती. तर शिवम फुलवळे हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सकनूर गावचा. त्याचे वडीलदेखील शिक्षक. घरची परिस्थिती चांगली. शिवम आणि भाग्यश्री एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते, त्यामुळे दोघांत मैत्री झाली. भेटीगाठी वाढत गेल्या.

30 मार्च रोजी शिवम याने भाग्यश्रीला सांगितले की, त्याच्या वाढदिवसाची पार्टी आहे. माझे काही मित्र-मैत्रिणी बरोबर आहेत. आपल्याला बाहेर जायचे आहे. त्यावेळी भाग्यश्री फिनिक्स मॉलमध्ये होती. शिवम कार घेऊन तेथे आला. त्याचे मित्र सागर आणि सुरेश हेसुद्धा कारमध्येच होते. मात्र भाग्यश्रीला माहिती नव्हते की, आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातील शेवटचा दिवस असून, तिचा मित्र शिवम हाच तिच्यासाठी काळ बनून आला आहे. मित्रावर आंधळा विश्वास ठेवून ती गाडीत बसली.

मात्र शिवमच्या डोक्यात एक भलताच कट शिजत होता. त्याला माहीत होते की, भाग्यश्रीचे पालक श्रीमंत आहेत. भाग्यश्रीसाठी ते पाच-दहा लाख रुपये सहज देतील. पैशासाठी सैतान संचारलेल्या शिवमच्या डोक्यात वेगळीच योजना सुरू होती. रात्री आठ वाजताच्या सुमारास गाडी नगरच्या दिशेने धावू लागली. काही अंतर पुढे गेल्यानंतर सागर आणि शिवम या दोघांनी चिकटपट्टीने भाग्यश्रीचे हात-पाय बांधले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता, दोघांनी तिचा गळा आणि तोंड दाबून तिचा खून केला. शिवम आणि त्याच्या मित्रांनी कामरगावच्या परिसरात आधीच एक खड्डाही खणून ठेवला होता. त्या ठिकाणी रात्री दीड वाजताच्या सुमारास ठरलेल्या निर्जनस्थळी तिघांनी भाग्यश्रीचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळला. त्यानंतर तो खड्ड्यात पुरून नांदेडला पळ काढला.

दुसरीकडे, घराबाहेर पडताना भाग्यश्रीनेदेखील आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला जात असल्याचे आईला सांगितले होते. दुसर्‍या दिवशी आईने तिला फोन केला तेव्हा तो बंद लागला. तिच्या घरच्यांनी पुण्यातील मित्र-नातेवाईक यांच्याशी संपर्क करून भाग्यश्रीबाबत विचारणा केली, तेव्हा ती बेपत्ता असल्याचे पुढे आले.

शिवम याने त्याच्या पूर्वनियोजित योजनेप्रमाणे भाग्यश्रीच्या मोबाईलवरूनच तिच्या घरच्यांकडे खंडणी मागण्यास सुरुवात केली. भाग्यश्रीच्या घरच्यांना धमकीचे मेसेज येऊ लागले, त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भाग्यश्रीच्या मोबाईलवरून खंडणीची मागणी होत असल्यामुळे पोलिस आणि नातेवाइकांनाही थोडा संशय आला. मात्र पोलिसांच्या लक्षात घटनेचे गांभीर्य आले. शिवम याने भाग्यश्रीच्या बँक खात्याचा अ‍ॅक्सेस घेण्यासाठी स्वतःचा मोबाईल क्रमांक टाकला आणि येथेच तो जाळ्यात अडकला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याचा ठिकाणा शोधून काढला. त्याला चौकशीसाठी बोलावले, त्यावेळी तो एखाद्या सोज्वळ तरुणासारखा उत्तरे देत होता. त्याने ‘तो मी नव्हेच’ म्हणण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र छडा लागेपर्यंत थांबतील ते पोलिस कसले.

अखेर पोलिसांनी त्याला बाप दाखव नाहीतर श्र्राद्ध घाल, असे सांगितले. त्याचवेळी त्याने खंडणीसाठी भाग्यश्रीचे अपहरण करून खून केल्याची कबुली दिली. यासाठी त्याने आपल्या दोघा मित्रांची मदत घेतली. पोलिसांनी याप्रकरणी, शिवम माधव फुलवळे (वय 21, रा. ऑक्सी हेवन सोसायटी, वाघोली. मूळ नांदेड), सुरेश शिवाजी इंदोरे (वय 23, रा. मुंबई, मु. सकनूर, नांदेड), सागर रमेश जाधव (वय 23, रा. कासलेवाडी, ता. शिरोळा अनंतपाळ, जि. लातूर) या तिघांना अटक केली. शिवम हा या घटनेतील मुख्य सूत्रधार आहे. पोलिसांच्या चौकशीत तिघांनी भाग्यश्रीचा खंडणीसाठी अपहरण करून खून केल्याचे सांगितले आहे. मात्र, मित्रावरील अतिविश्वासामुळे भाग्यश्री आज या जगात नाही.

Back to top button