Girish Mahajan : जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गिरीश महाजन यांच्यासह दहा जणांविरुध्द गुन्हा
भाजपतर्फे सोमवारी (दि.०१) जळगावातील शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. दरम्यान जमाबवंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवारी रात्री उशीरा माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह १० जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Girish Mahajan)
सविस्तर माहिती अशी की, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपतर्फे सोमवारी (दि. १) दुपारी शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह हजारोंच्या संख्येने शेतकरी आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
Girish Mahajan : जळगाव जिल्ह्यातील सर्वच खासदार आमदारांवर गुन्हे
दरम्यान, या मोर्चामुळे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाले. याप्रकरणी माजी मंत्री आ. गिरीश महाजन, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, खा. उन्मेष पाटील, खा. रक्षा खडसे, आ. सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. चंदुलाल पटेल, आ. संजय सावकारे. जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील या दहा जणांविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पो.कॉ. राकेश दुसाने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

