Lookout Notice Against Param Bir Singh : परमबीर सिंग कसे पळाले? | पुढारी

Lookout Notice Against Param Bir Singh : परमबीर सिंग कसे पळाले?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग कसे पळाले, याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. (Lookout Notice Against Param Bir Singh)

देशमुख यांना फसवले गेले आहे. त्यांच्यावर ज्या व्यक्तीने आरोप लावले, ती व्यक्ती स्वतः फरार आहे आणि आरोप असलेली व्यक्ती स्वतःहून चौकशीला गेली, तर त्यांना अटक करण्यात आली.

ही कारवाई राजकीय सुडातून आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना घाबरविण्यासाठी केली गेली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Lookout Notice Against Param Bir Singh : पुढचा नंबर अनिल परब यांचा

भाजपच्या नेत्यांनी ट्विट करून, पुढचा नंबर अनिल परब यांचा असल्याचे सांगितले आहे. याचा अर्थ सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. परमबीर सिंग हे महाराष्ट्रातून चंदीगड येथे गेले. त्यानंतर ते परतले नाहीत. काही लोक सांगतात, ते परदेशात गेले आहेत.

‘लूकआऊट’ नोटीस असतानाही कोणतीही व्यक्ती देश सोडून कशी जाऊ शकते. एक तर हवाईमार्गे किंवा रस्ते मार्गाने जावे लागेल.

उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार या तीन राज्यांतून नेपाळला जाता येते.

या तिन्ही राज्यांत भाजपचे सरकार आहे. इतर लोकांप्रमाणे परमबीर सिंग यांना पळून जाण्यास मदत करण्यात आली आहे का, असेही मलिक म्हणाले.

देशमुखांवर सूडभावनेने कारवाई : नाना पटोले

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने केलेली अटक सुडभावनेतून असून यात सत्याचा विजय होईल, देशमुख बाहेर येतील, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

भाजप केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना संपवण्याचे काम करत आहे.

प्रचंड वाढत्या महागाईकडे, शेतकर्‍यांच्या, कामगारांच्या प्रश्नांकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. केवळ विरोधकांना टार्गेट केले जात आहे, असे पटोले यांनी सांगितले.

जाती-धर्माच्या नावावर राजकीय पोळी भाजणार्‍या भारतीय जनता पक्षाला जनता त्यांची जागा दाखवून देईल, असे ते म्हणाले.

Back to top button