Parli Vaijnath: हजारो शिवभक्तांनी घेतले प्रभू वैजनाथांचे दर्शन | पुढारी

Parli Vaijnath: हजारो शिवभक्तांनी घेतले प्रभू वैजनाथांचे दर्शन

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : पहिल्या श्रावण सोमवारी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो शिवभक्तांनी श्री प्रभू वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. पहिला श्रावण सोमवार व नागपंचमी एका दिवशी आल्याने भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. शिवामूठ तांदूळ व बिल्वपत्र वाहून भक्तांनी दर्शन घेतले. नागपंचमीची मंदिर परिसरात महिलांनी भूलई खेळली. वैद्यनाथ मंदिरात असलेल्या नागनाथाच्या मंदिरात पूजन करीत भाविकांनी दर्शन घेतले.

आज पहाटेपासून भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सकाळी प्रभू वैजनाथाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी प्रा. बाबासाहेब देशमुख, विश्वस्त राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

निज श्रावणमासास १७ ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे. आज (दि.२१) पहिला श्रावण सोमवार असल्याने रात्री बारा वाजल्यापासूनच भक्तांची दर्शनासाठी रांग लागली होती. हजारो शिवभक्तांना दर्शन घेणे सुलभ व्हावे, यासाठी श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने पास धारक व धर्मदर्शन महिला -पुरुषांची स्वतंत्र रांगा लावण्यात आल्या होत्या.

वैजनाथ मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पुष्प सजावटीमुळे मंदिर परिसर मनमोहक दिसून येत होता. मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. अंबाजोगाई चे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले, परळी शहरचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी मंदिरात परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

हेही वाचा 

Back to top button