बीड : पावसाअभावी सोयाबीन पीक करपू लागले; शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे | पुढारी

बीड : पावसाअभावी सोयाबीन पीक करपू लागले; शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे

नेकनूर, मनोज गव्हाणे महिनाभराच्या खंडानंतर तीन दिवसांपासून आभाळात ढग दाटून येत आहेत. मात्र पाऊस पडत नसल्याने जोमात आलेले सोयाबीन सुकण्याबरोबर आता करपू लागले आहे. दोन, चार दिवसात पाऊस पडला नाही तर खरिपाच्या पेरणी वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहे. पावसाच्या कालावधीतच पावसाची ओढ पिकांना मारक ठरली आहे.

गतवर्षी सोयाबीनची गोगलगाय, यलो मोझ्याक रोगाने अनेक भागात मोठे नुकसान केले होते. यावर्षी या रोगांचा शिरकाव नसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. गोगलगायीमूळे क्वचित ठिकाणी दुबार पेरणी झाली, मात्र महिनाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने बहरलेले सोयाबीन पीक माना टाकू लागले आहे. तीन दिवसांपासून आभाळ दाटून येत आहे. मात्र पाउस कोसळत नसल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.

माळावरचे सोयाबीन तर पदरातून गेले असताना दमदार रानातील पीक हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी मोठा पाऊस नसल्याने बोरवेल, विहिरींना पाणी आलेले नाही. त्यामुळे पीकांना जगवण्याचे काम ही शेतकऱ्यांना करता येत नाही. दोन तीन दिवसात पाऊस पडला नाही, तर खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत बुडाला आहे. फुलं, शेंगा लागण्याच्या कालावधीतच पावसाने दिलेली ओढ उत्पन्नासाठी मारक असली तरी आताही पाऊस पडला तरी किमान खर्च निघेल या आशेवर शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button