लोकसभा पोटनिवडणूक : सेनेचा भाजपला जोरदार धक्का; डेलकर यांचा विजय | पुढारी

लोकसभा पोटनिवडणूक : सेनेचा भाजपला जोरदार धक्का; डेलकर यांचा विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क

खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर दादरा नगर हवेली येथे लागलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी ५१ हजार नऊ मते मिळवित विजय प्राप्त केला. येथे भाजपला जोरदार धक्का बसला असून डेलकर शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उभ्या होत्या.

डेलकर यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये मुबंईत आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पत्र लिहून ठेवले होते त्यात प्रशासक प्रफुल्ला खेडा पटेल यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांची नावे होती. महाराष्ट्र सरकारने या आत्महत्येची चौकशी सुरू केली होती.

मात्र, वाझेप्रकरण आणि अन्य प्रकरणांच्या गदारोळात डेलकर तपास मागे पडला. त्यानंतर लागलेल्या निवडणुकीत शिवसेनेने डेलकर यांच्या पत्नीला तिकीट दिले होते. कलाबेन डेलकर सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाल्यापासून मताधिक्य घेऊन आघाडीवर होत्या. अखेर दुपारी तीन वाजता निकाल जाहीर झाला. त्यात त्यांनी ५१ हजार ९ मतांनी बाजी मारली. डेलकर यांनी भाजपच्या महेश गावित यांचा पराभव केला.

देगलूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर

देगलूर विधानसभा निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर आणि भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांच्यात जोरदार लढत होती. मात्र, अंतापूरकर यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम रामराव इंगोले हेही निवडणूक रिंगणात आहेत. २१ व्या फेरीअखेर ३०२६६ मतांची निर्णायक आघाडी घेऊन अंतापूरकर विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

मोहन डेलकर यांनी सातवेळा मिळविला विजय

२२ फेब्रुवारी, २०२१ रोजी दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर पश्चिम मुंबईतील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळले होते. त्यांनी आत्महत्या केल्याचे पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले. १० डिसेंबर १९६२ रोजी जन्मलेले डेलकर दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातून सात वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. स्वतंत्र राजकारण ही त्यांची ख्याती होती. २०१९ मध्ये अपक्ष म्हणून त्यांनी सातव्यांदा निवडणूक लढविली होती. त्यांनी भाजपच्या नथुभाई पटेल यांना नऊ हजार मतांनी पराभूत केले होते.

हेही वाचा: 

Back to top button