पुणे : डिझेल बसचे सीएनजीत रूपांतर करा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील | पुढारी

पुणे : डिझेल बसचे सीएनजीत रूपांतर करा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रदूषणावर मात करण्यासाठी हरित ऊर्जेच्या वापरावर भर देणे आवश्यक असून, त्यादृष्टीने ‘पीएमपीएमएल’च्या डिझेलवरील सर्व बसेस सीएनजीमध्ये रूपांतरित कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी महापालिकेत आढावा बैठक घेतली. या वेळी पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीस आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह पीएमपीएमएलचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी पाटील यांनी पीएमपीएमएलचे मनुष्यबळ, निवृत्त कर्मचार्‍यांची देणी व इतर आर्थिक बाबींसह रस्ते दुरुस्ती, कात्रज- कोंढवा रस्त्याचाही आढावा घेतला.

पीएमपी एमएलच्या मालकीच्या डिझेल इंधनावरील कार्यरत 123 बसेस तसेच बंद स्थितीतील 50 बसेस अशा सर्व बसेस येत्या दोन महिन्यांत टप्प्याटप्प्याने सीएनजीवर रूपांतरित कराव्यात, जेणेकरून पीएमपीएमएल ही संपूर्ण बसेस सीएनजी व ई-बसेसच्या रूपात हरित ऊर्जेवर आधारित सेवा होईल. चालू बसेस बंद पडण्याचे प्रमाण शून्यावर येण्यासाठी प्रयत्न करा, अशाही सूचना पाटील यांनी केल्या.

‘कात्रज- कोंढवा रस्त्यावर उपाययोजना करा’

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम संबंधित कंत्राटदारांकडूनच करून घेतले जात असल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी या वेळी सांगितले. तसेच कात्रज- कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी महापालिका तसेच शहर पोलिस वाहतूक शाखेने एकत्रित उपाययोजना करून अंमलबजावणी करावी. वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी प्रयत्न करा, असेही पालकमंत्री पाटील या वेळी म्हणाले.

हेही वाचा

इजिप्तजवळ होती व्हेल माशांची वेगळी प्रजाती

लग्नाचे आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा, १० वर्ष कारावासाची तरतूद

नगर : राजळेंमुळे वृद्धेश्वर कारखाना सुस्थितीत : नितीन पवार

Back to top button