इजिप्तजवळ होती व्हेल माशांची वेगळी प्रजाती | पुढारी

इजिप्तजवळ होती व्हेल माशांची वेगळी प्रजाती

कैरो : सध्याच्या इजिप्तजवळ समुद्रात 4 कोटी 10 लाख वर्षांपूर्वी व्हेल माशांची एक वेगळी प्रजाती अस्तित्वात होती. प्राचीन काळातील व्हेलची ही सर्वात लहान आकाराची प्रजाती होती. या प्रजातीमधील लहान वयातच मृत्युमुखी पडलेल्या एका व्हेलचे जीवाश्म सापडले आहे. संशोधकांनी या व्हेल प्रजातीला इजिप्तमधील लहान वयातच मृत्युमुखी पडलेल्या फेरो तुतानखामेनचे नाव (टूट) दिले आहे. हा ‘फेरो’ म्हणजेच राजा अवघ्या अठराव्या वर्षीच मृत्युमुखी पडला होता. सोन्या-चांदीच्या खजिन्याने भरलेला त्याचा मकबरा सापडल्यानंतर तो जगभर चर्चेत आला होता.

व्हेलच्या या प्रजातीला ‘टूटसेटस रायानेन्सिस’ असे नाव देण्यात आले आहे. ही प्रजाती ‘बेसिलोसॉरीड’ या लुप्त झालेल्या पूर्णपणे जलचर अशा सस्तन प्राण्यांच्या कुळातील आहे. या कुळातील हा सर्वात लहान आकाराचा व्हेल आहे. ‘कम्युनिकेशन्स बायोलॉजी’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की या व्हेलची लांबी सुमारे 8 फूट इतकी होती आणि वजन 187 किलो होते.

सध्याच्या प्रौढ वाघाचे वजन इतके असते. बेसिलोसॉरीडस् कुळातील अन्य जलचरांची लांबी ही 13 ते 59 फुटांची होती. इजिप्तमध्ये नाईल नदीजवळील ‘फायूम डिप्रेशन’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या वाळवंटात या व्हेलचे जीवाश्म सापडले होते. त्यामध्ये कवटी, जबडा, दात आणि मणक्याच्या अवशेषांचा समावेश होता.

Back to top button