धोंड्याच्या महिन्यामुळे जावयांची चंगळ | पुढारी

धोंड्याच्या महिन्यामुळे जावयांची चंगळ

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सध्या सुरू असलेल्या अधिक मास म्हणजे धोंड्याच्या महिन्यामुळे जावयांची चंगळ होत आहे. सासरवाडीकडून जावयांचा मानसन्मान होऊन विविध भेटवस्तू मिळत असल्याने जावईवर्गात आनंदाचे वातावरण आहे. तर, दुसरीकडे अनेक जावयांच्या सासरवाडीची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने जावयांना फक्त धोंड्याच्या जेवणावर समाधान मानावे लागत असल्याने ते नाराज होत आहेत.

अधिक मास हा महिना तीन वर्षांतून एकदा येतो. ग्रामीण भाषेत याला धोंड्याचा महिना म्हणतात. या महिन्याला शास्त्रात महत्त्व असून, या महिन्यात मुलगी व जावयाला चांदीची भेटवस्तू देणे तसेच पुरणपोळीचे जेवण करणे, अशी प्रथा आहे. तीन वर्षांनंतर हा महिना आल्याने सध्या जावईबापूंची चंगळ आहे. जावईबापू व मुलीला विविध भेटवस्तू, पोशाख, साडी, मिठाई व दागिना घेण्यासाठी सोन्याची दुकाने, कापडाची दुकाने, मिठाईची दुकाने येथे गर्दी दिसत आहे.

ज्यांच्या सासरवाडीची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा सासरवाडीत जावयाचा मानपान चांगल्या प्रकारे होऊन जावयाला घड्याळ, सोन्याची अंगठी, सोनसाखळी, चांदीचे ताट, निरंजन, अशा भेटवस्तू मिळत असून, मुलीला जोडवी, साडी मिळत आहे. दुसरीकडे ज्या जावईबापूंच्या सासरवाडीची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्यांना मात्र धोंड्याच्या जेवणावर समाधान मानावे लागत आहे.

मुलीच्या सुखासाठी पदरमोड

मुलगी आपल्या आई-वडिलांकडे जावयासाठी काहीतरी घ्या, असा हट्ट करीत असल्याने मुलीचा संसार सुखात चालावा म्हणून आर्थिक परिस्थिती बेताची असताना परंपरा व जावयाचा मान राहावा म्हणून काही ना काही भेटवस्तू जावयास देत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ज्यांचे लग्न मागील दोन-तीन वर्षांत झाले आहे, त्या जावईबापूंचा सन्मान मोठ्या थाटामाटात होत असून, अगोदर लग्न झालेल्या जावईबापूंना मात्र टॉवेल, टोपी, पोशाख आणि जेवणावर समाधान मानावे लागत आहे.

हेही वाचा

Chandrayaan-3 : चंद्राच्या कक्षेतील १०० कि.मी.चा टप्पा गुंतागुंतीचा : ‘इस्रो’ची माहिती

पुणे : निदर्शने करणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुणे : पदव्या देणार्‍या महाविद्यालयांचे पेव! विनाअनुदानित महाविद्यालयांचे शैक्षणिक दर्जाकडे दुर्लक्ष

Back to top button