पुणे : निदर्शने करणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : निदर्शने करणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा हे सहकार परिषदेच्या अनुषंगाने पुणे दौर्‍यादरम्यान त्यांचा काफिले जात असताना निदर्शने करणार्‍या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे.

याप्रकरणी राहुल दुर्योधन,राजू पांडू ठोंबरे (वय 35), स्वप्निल रवींद्र नाईक (वय 27 ),आशुतोष नितीन जाधवराव (वय 30), अक्षय अनिलकुमार जैन (वय 31),अक्षय प्रकाश माने, योगेश सर्जेराव जाधव यादव (वय 34 ) या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप अंबादास गायकवाड (वय 37) यांनी आरोपींविरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपापसात संगनमत करून, बेकायदेशीररीत्या 6 जुलै रोजी जमाव जमवला. केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा काफिले जात असताना, निदर्शने करण्याबाबत कोणतीही पोलिस परवानगी नसताना, संबंधित काँग्रेस कार्यकर्ते हातात पोस्टर घेऊन घोषणाबाजी करत असताना मिळून आले आहे. त्यांना सदर ठिकाणाहून जाण्याबाबत पोलिसांनी आदेश देऊनदेखील ते संबंधित ठिकाणावरून निघून गेले नाहीत. त्यामुळे त्यांनी पुणे शहर विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्याकडील आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button