कोल्हापूर : धरणांच्या परिचलनाकडे तातडीने लक्ष न दिल्यास महापुराचा धोका | पुढारी

कोल्हापूर : धरणांच्या परिचलनाकडे तातडीने लक्ष न दिल्यास महापुराचा धोका

नृसिंहवाडी; विनोद पुजारी : अलमट्टीसह कृष्णा खोऱ्यातील धरणांच्या परिचलनाकडे राज्य शासन आणि जलसंपदा विभाग यांनी तातडीने आणि गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व धरणातून विसर्ग होतो की नाही यावर बारकाईने लक्ष दिले पाहिजे. तसा विसर्ग होत नसेल तर त्यासाठी पावले उचलली पाहिजेत. अन्यथा ऑगस्ट अखेर पर्यंत पुन्हा एकदा महापुराचा धोका आहे.

राज्य शासन, कोल्हापूर व सांगली जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी सध्या महापूर रोखण्याऐवजी महापूर आल्यानंतर आपत्ती निवारणासाठी कोणते उपाय करायचे याकडेच सगळे लक्ष दिलेले दिसते आहे. महापूर रोखण्यासाठी शासकीय पातळीवरून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. महापूर आल्यानंतर काय करायचे हे महत्त्वाचे आहे; पण महापूर येऊ नये यासाठीच आता तातडीने आणि गांभीर्याने पावले उचलली पाहिजेत. अन्यथा ऑगस्ट अखेर पर्यंत महापुराचा धोका संभवतो.

कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे महापुराचा धोका वाढतो हे वारंवार सिद्ध झाले आहे. गेले आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी नृसिंहवाडीमध्ये पाणी अद्याप उतरायला तयार नाही. सध्या अलमट्टी धरणात ५१९.२५ मीटर पातळीपर्यंत पाणी साठले आहे. पूर्ण क्षमतेने पाणी साठवण्यासाठी आता फक्त तीनशे पन्नास मिलिमीटरची कमतरता आहे. या धरणाची पाणी साठवण्यासाठीची उंची ५१९.६० मीटर असून १२३.०८ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. सध्या अलमट्टी धरणामध्ये ११७.३ टीएमसी पाणी साठलेले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी अलमट्टी धरण भरणार आहे. ते धरण भरले की महापुराचा धोका निश्चितच वाढणार आहे.

कोयना, वारणा तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि अन्य सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या धरणांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेले आहे. टप्प्याटप्प्याने पाणी साठवण्याची क्षमता कमी होत जाणार आहे आणि विसर्ग वाढवावा लागणार आहे.

कोयना धरणामध्ये सध्या ७९.७० टीएमसी आणि वारणा धरणामध्ये २९.१७ टीएमसी पाणी आहे. परंतु पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला तर ही दोन्ही धरणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणे लवकरच भरतील. मग विसर्ग प्रचंड प्रमाणात वाढवावा लागेल. त्याचवेळी अलमट्टी धरणातून विसर्ग कमी आणि पाणी पातळी ५१९ मीटर असेल तर शंभर टक्के महापुराचा धोका संभवतो.
कोयना आणि वारणेसह कृष्णा खोऱ्यातील धरणांचे परिचलन सांभाळतानाच अलमट्टी धरणातून सातत्याने विसर्ग वाढवण्यासाठी आत्तापासूनच तातडीने हालचाल केली पाहिजे. अलमट्टी धरणामध्ये गेल्या २४ तासात ८७ हजार ८४१ क्युसेक पाण्याची आवक होत होती. तर धरणातून गेल्या २४ तासात ४४ हजार २३१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. परंतु तोही आता कमी केला असून सध्या ४२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणात ज्या पद्धतीने पाण्याची आवक होत आहे त्या पद्धतीने विसर्ग सध्या होत नाही. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचे प्रमाण येत्या चार-पाच दिवसात वाढणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महापुराचा धोका अद्याप आहे.

जुलै महिन्यामध्ये केवळ दहा-बारा दिवसातच पाऊस वाढला आणि सर्व धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. शुक्रवारपासून मोसमी पावसाचे नक्षत्र बदलते आहे. त्यामुळे पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तरी राज्य शासन आणि जलसंपदा विभाग यांनी तातडीने कर्नाटक सरकारशी समन्वय साधून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला पाहिजे. अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण होईल.

महापूर आल्यानंतर काय करायचे यामध्ये सध्या सगळी शासकीय यंत्रणा गुंतलेली आहे, असे दिसून येत आहे. परंतु महापूर येऊ नये यासाठी तातडीचे उपाय आणि पावले उचलण्याची गरज आहे.
– धनाजी चुडमुंगे, आंदोलन अंकुश संघटना

हेही वाचा : 

Back to top button