कृषी अधिकारी देणार शेतकरी दाखला | पुढारी

कृषी अधिकारी देणार शेतकरी दाखला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये भागधारक म्हणून सहभागी होण्यासाठी लागणारा शेतकरी असल्याचा दाखला तालुका कृषी अधिकारी देणार आहेत. शेतकर्‍यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावे शेती असल्यास त्या कुटुंबातील कोणत्याही अन्य सदस्याला शेतकरी असल्याचा दाखला देण्याच्या परिपत्रकीय सूचना कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिल्या आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनीसाठी (एफपीसी) शेतकरी असल्याचा दाखला मिळण्यातील अडचणी दूर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शासनाच्या निर्णयान्वये कुटुंब म्हणजे पती, पत्नी व 18 वर्षांखालील अपत्यांचा समावेश होतो. असा दाखला केवळ शेतकरी उत्पादक कंपनीचा भागधारक म्हणून कंपनीत सहभागी होण्यासाठीच राहणार असल्याचेही कृषी आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील 79.52 टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी अल्प व अत्यल्पभूधारक आहेत. अशा परिस्थितीत वैयक्तिक शेतकर्‍यांनी एकट्याने शेती करण्यापेक्षा शेतकर्‍यांचे गट स्थापन करून गटशेती करणे आवश्यक आहे.

ही बाब लक्षात घेऊन शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यावर केंद्र व राज्य सरकारचा भर राहिलेला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करतेवेळी त्यात महिला शेतकर्‍यांचाही सहभाग राहणे आवश्यक आहे. तथापि, राज्यात महिलांच्या नावे जमिनीचा सातबारा उतारा असलेल्या महिला शेतकर्‍यांची संख्या अल्प (15.46 टक्के) आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये भागधारक म्हणून सहभागी होण्यासाठी कंपनी निबंधकांकडून (आरओसी) शेतकरी असल्याबाबत दाखला मागितला जातो. शेतकरी कुटुंबातील ज्यांच्या नावे शेती नाही अशा महिला अथवा अन्य सदस्यांना शेतकरी म्हणून दाखला मिळण्यात अडचणीत येत असल्याची निदर्शनास आली आहे. ही बाब लक्षात घेऊनच परिपत्रकांन्वये कृषी आयुक्तांनी निर्देश दिलेले आहेत.

कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिलेल्या परिपत्रकीय सूचनांन्वये जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये भागधारक म्हणून सहभागी होण्यासाठीचा शेतकरी असल्याचा दाखला तालुका कृषी अधिकारी देत आहेत. त्यादृष्टीने दाखल अर्जांवर तत्काळ निर्णय घेऊन काम सुरू आहे.

– संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे.

हेही वाचा

गुंडेगाव प्राथमिक शाळेची जीर्ण इमारत धोकादायक!

kolhapur crime : कॅफे, लॉजवर छापेमारी; ४ प्रेमी युगुलांसह १६ ताब्यात

शासकीय रुग्णालयांत खासगी एजंटांचा बाजार!

Back to top button