वर्ल्ड चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या सोनम मस्करला रौप्य | पुढारी

वर्ल्ड चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या सोनम मस्करला रौप्य

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : दक्षिण कोरिया येथे झालेल्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या सोनम मस्कर हिने सांघिक रौप्य पदकाचा वेध घेतला. सोनमने गौतमी बानोट व स्वाती चौधरी यांच्या सोबत १० मीटर एअर रायफल प्रकारात १८८६.६ गुणांची कमाई करत भारताला रौप्य पदक मिळवून दिले. गेल्या दोन महिन्यांमध्ये तिचे हे दुसरे आंतरराष्ट्रीय पदक आहे. वर्षभर केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तिचे भारतीय संघात स्थान पक्के झाले आहे.

सोनम ने कॉलिफिकेशन राऊंडमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करत ६३०.६ गुण मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले होते. फायनल मध्ये पोचणारी ती मुलींच्या गटात एकमेव भारतीय होती. दरम्यान, सोनमने मागील महिन्यात वर्ल्डकप स्पर्धेत सांघिक सुवर्णपदकाची कमाई केली होती. तत्पूर्वी तिने एप्रिल महिन्यात झालेल्या भारतीय सिलेक्शन ट्रायल मध्ये ६३१.४ व ६३१.० गुणांची कमाई करत भारतीय संघात स्थान पक्के केले होते.

सोनम पुष्पनगर (गारगोटी) गावची कन्या असून गेली तीन वर्षे वेध रायफल आणि पिस्तल शूटिंग अकॅडमी मध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाज व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या राधिका हवालदार – बराले, रोहित हवालदार-बराले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिला उत्तम मस्कर, प्राचार्य अय्यर, क्रीडा शिक्षक डॉ. निसार हुसेन व डिस्ट्रिक्ट मेन अँड वुमेन रायफल असोसिएशनचे प्रोत्साहन लाभत आहे.

हेही वाचा : 

Back to top button