कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील निलजी बंधारा पाण्याखाली | पुढारी

कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील निलजी बंधारा पाण्याखाली

गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन-चार दिवसांपासून पश्चिम घाटासह आजरा, गडहिंग्लज तालुक्यांत जोरदार पाऊस सुरु असून हिरण्यकेशी आणि घटप्रभा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडू लागले आहे. आज (दि. २०) सकाळी गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वेकडील निलजी बंधारा पाण्याखाली गेला असून, या बंधार्‍यावरुन होणारी वाहतूक बंद झाली आहे. काल (दि. १९) सायंकाळी पश्चिमेकडील ऐनापूर बंधार्‍यावर पाणी आले होते. त्यावरील वाहतूक बंद झाल्याने आजरा तालुक्याच्या पूर्वेकडील गावांचा गडहिंग्लजशी होणारा थेट संपर्क तुटला होता. मात्र आज पाणी उतरल्याने तो वाहतुकीला खुला झाला आहे.

मोठ्या प्रतीक्षेनंतर गेल्या तीन दिवसांत पावसाने जोर धरला आहे. कोकणपट्ट्यासह हिरण्यकेशीच्या उगमक्षेत्रात धुंवाधार पाऊस सुरु आहे. यामुळे आजरा, गडहिंग्लजसह सीमाभागाची जीवनवाहिनी असलेल्या हिरण्यकेशीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. मंगळवारी रात्री आजरा तालुक्यातील साळगाव बंधारा सर्वप्रथम पाण्याखाली गेला होता. त्यानंतर बुधवारी सायंकाळी ऐनापूर बंधारादेखील पाण्याखाली गेल्याने आजरा तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागला होता. रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाल्याने ऐनापूर बंधार्‍यावरील पाणी उतरले आहे. मात्र पूर्वेकडील निलजी बंधारा पाण्याखाली गेला आहे. सुमारे एक फुटाहून अधिक पाणी आल्याने नूल, हलकर्णी परिसरातील गावांची वाहतूक जरळी, भडगावमार्गे सुरु झाली आहे.

दरम्यान, पावसाने एसटी वाहतुकीचे नियोजन कोलमडले असून, काही गावांतील फेर्‍या अचानक रद्द झाल्याने विद्यार्थी, प्रवाशांना फटका बसला आहे. अनेक शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती घटल्याचे दिसून आले.

जनजीवन विस्कळीत

संततधार पावसाने गडहिंग्लज शहरासह ठिकठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले असून, एसटी वाहतूक बंद झाल्याने व्यापारपेठेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. पावसामुळे दुकानांमध्ये ग्राहकांची संख्या रोडावली असून, कृषी केंद्रांवर वर्दळ वाढल्याचे दिसत आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरही परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले.

हेही वाचा : 

Back to top button