नगर : वायसेवाडीत जलजीवन योजनेचा बोजवारा ; ग्रामस्थांकडून तक्रारी | पुढारी

नगर : वायसेवाडीत जलजीवन योजनेचा बोजवारा ; ग्रामस्थांकडून तक्रारी

खेड : पुढारी वृत्तसेवा : ’हर घर जल’ या संकल्पनेतून केंद्र सरकारने ग्रामीण भागाला पुरेसे आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जल जीवन मिशन सुरू केले. मात्र, या योजनेला कर्जत तालुक्यातील वायसेवाडी येथे निकृष्टता व गैरव्यवहाराची घरघर लागली आहे.
वायसेवाडी (ता.कर्जत) येथे योजनेच्या निकृष्ट कामासंदर्भात ग्रामस्थांकडुन तक्रारी करण्यात येत आहेत. याबाबत ग्रा.पं.सदस्य कैलास कायगुडे यांनी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे निवेदन दिले.

जल जीवन योजनेचे सुरू असलेले काम अंदाजपत्रकानुसार होत नसून, योजनेची पाईपलाईन खडीकरण केलेले रस्ते उकरून रस्त्याच्या मधोमध खोदण्यात आली. त्यामुळे ग्रामपंचायतने नागरिकांच्या सुविधेसाठी खर्च केलेले लाखो रुपये अक्षरशःचिखलात माखले आहेत. पीव्हीसी पाईप हलक्या प्रतीचे वापरण्यात आले असून, ही पाईप लाईन अनेक ठिकाणी केवळ एक ते दीड फूट अंतरावरच जमिनीत गाडली आहे. भविष्यात गावात रस्ता रुंदीकरण झाल्यास पाईप लाईन फुटून ही योजना मातीत जाण्याची शक्यता आहे. योजनेच्या विहिरीची खोली आणि इतर बाबी अंदाजपत्रकानुसार नाहीत. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये, असे निवेदनात म्हटले आहे.फ

कामाची सखोल चौकशी करा
योजनेच्या कामाचा दर्जा सांभाळला नाही. मंजूर असलेल्या विहिरीची सिमेंटची संरक्षक रिंग खडकालगत बांधलेली नाही. पाईपलाईनची चारी खूपच कमी अंतरावर खोदली. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य महादेव मोरे यांनी केली आहे.

एकाच ठेकेदाराकडे अनेक कामे !
तालुक्यातील बहुतांशी गावांची कामे ठराविक ठेकेदारांनी घेतलेली असून, ती कामे ज्या-त्या भागातील छोटमोठे कार्यकर्ते मिळून करीत आहेत. मात्र, स्थानिक असल्याचे सांगत हे कार्यकर्ते अनुभवाअभावी कामात अनेक कसूर करीत आहेत. याचा मोठा तोटा अनेक गावांच्या योजनांवर होत आहे.

हे ही वाचा : 

नगर : पीक कर्जाचे 1.40 लाख लांबविले ; जामखेड बसस्थानकाजवळ भरदुपारी चोरट्याने मारला डल्ला

बेळगाव : कारवारसह किनारपट्टीवर मुसळधार

Back to top button