

जामखेड (नगर ) : पुढारी वृतसेवा : सेवानिवृत्त शिक्षकाने बँकेतून काढलेली पीककर्जाची 1 लाख 40 हजार रूपयांची रक्कम असलेली मोटारसायकलला लावलेली पिशवी चोरट्याने लांबविली. येथील कॅनरा बँकेसमोर गुरूवारी दुपारच्या वेळी घटना घडली. सेवानिवृत्त शिक्षक असलेले बाबुराव संभाजी राजेभोसले (रा. नान्नज, ता.जामखेड, हल्ली रा. प्रभाकरनगर, जामखेड) हे शेती व्यवसाय करतात. त्यांच्यासह पत्नी मनिषा राजेभोसले व मुलगा उदयसिंह राजेभोसले यांचे जामखेड येथील कॅनरा बँकेत खाते आहे.
या तिघांनीही कॅनरा बँकेतून मागील वर्षी पीककर्ज घेतले होते. मागील आठवड्यात सदरचे कर्ज भरूलयानंतर, प्रत्येकी 1 लाख 43 हजार रूपये नवीन पीककर्ज मंजूर झाले होते. बँकेतून 1 लाख 40 हजार रूपये काढून ते पिशवीत ठेवून मोटारसायकलच्या हॅन्डलला अडकवली होती. त्यांना फोन आल्याने बोलत असताना समोरून आलेल्या एका व्यक्तीने त्यांना काही समजायच्या आत हॅन्डलला लावलेली पैशांची पिशवी घेवून पळ काढला. त्यांनी आरडाओरडा केला व चोरट्याच्या मागे पळू लागले. चोरटा बसस्थानकाच्या दिशेने गेला. रस्त्यावर असलेल्या चिखलात राजेभोसले घसरून पडले. तोपर्यंत चोरटा पसार झाला.
त्यानंतर बसस्थानक व आसपास त्यांनी चोरट्याचा शोध घेतला. पण, तो सापडला नाही. त्यानंतर राजेभोसले यांनी जामखेड पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महेश पाटील व कर्मचार्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन आरोपीच्या शोधासाठी चक्रे फिरविली आहेत.
हे हे वाचा :