बेळगाव : कारवारसह किनारपट्टीवर मुसळधार | पुढारी

बेळगाव : कारवारसह किनारपट्टीवर मुसळधार

कारवार; पुढारी वृत्तसेवा :  कारवारसह किनारपट्टीवरील जिल्ह्यांत जोरदार पाऊस कोसळत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. त्याचबरोबर मंगळूर, उडपी जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आला असून, अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात 10 जुलैपर्यंत मुसळधार पाउस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

भटकळ तालुक्यातही मुसळधार पाऊस झाल्याने दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना रस्त्यावर आलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली. कारवार जिल्ह्यातल्या काही शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राजधानी बंगळूर येेथे गुरुवारी सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी पाणी रस्त्यावर आल्याने रहदारी ठप्प झाली होती.

चार जणांचा मृत्यू

किनारपट्टी भागासह राज्यात चार जणांचा मृत्यू झाला. कारवार आणि उडपी जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला असून सार्वजनिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ओढ्यात पडून दिवाकर शेट्टी (वय 53), वीजतारेच्या स्पर्शाने संतोष (वय 31) यांचा मृत्यू झाला, तर शेषाद्री ऐताळ (वय 73) हे अरुंद पुलावरुन जाताना नदीत बुडाले. कारवार तालुक्यातील अरगा गावात घर पडल्याने ताराबाई (वय 81) या वृध्देचा मृत्यू झाला.

जलाशयातून विसर्ग

लिंगनमक्की जलाशयातून 9237 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. काबिनी जलाशयातून 3431 क्युसेक, भद्रा जलाशयातून 2397 क्युसेक, सुपा जलाशयातून 1736 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

बेळगावातही बरसणार?

पुढील चार दिवसांत बेळगाव, धारवाड, गदग, हावेरी, गुलबर्गा, रायचूर, चिक्कमंगळूर, दावणगिरी, कोडगू, शिमोगा आणि विजयनगर जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Back to top button