अहमदनगर : द़ृूध भेसळ करणारांनो, आता सावधान! | पुढारी

अहमदनगर : द़ृूध भेसळ करणारांनो, आता सावधान!

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी आता जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती धडक तपासणी मोहीम राबविणार असून, भेसळखोरांवर थेट गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे. समितीने केलेल्या कारवाईचा अहवाल दरमहा शासनाला पाठवावा लागणार आहे. राज्यातील दूध दर व दूध भेसळ प्रश्नाबाबत दूध उत्पादक, सहकारी व खासगी दूध संघ, पशुखाद्य उत्पादक कंपन्या व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 22 जूनला बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत दूध उत्पादक संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्यात दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करण्यात येत असल्याचे सांगितले. दूध भेसळीमुळे एकूण दूध उत्पादन व मागणी यामध्ये तफावत निर्माण होऊन, राज्यात दुधाचा कृत्रिम फुगवटा तयार केला जातो.त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या दुधाला रास्त दर मिळत नाही. याशिवाय भेसळीच्या दुधामुळे जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत, असेही बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले.

राज्यातील जनतेला स्वच्छ व गुणवत्तापूर्ण दुधाचा पुरवठा होण्याच्या अनुषंगाने दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे. समितीने धडक तपासणी मोहीम हाती घ्यावी. भेसळीत सहभागी असणार्‍या व्यक्ती किंवा आस्थापना विरोधात गुन्हा (एफआयआर) नोंदवून कारवाई करण्यात यावी.

यामध्ये दूध भेसळ करणार्‍या व्यक्तींबरोबर हे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ स्वीकारणार्‍या व्यक्ती किंवा आस्थापनांही सहआरोपी करण्यात यावे. समितीमार्फत करण्यात येणार्‍या कार्यवाहीचे नियंत्रण दुग्धव्यवसाय विभागाचे आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासन विभागचे आयुक्त यांच्यामार्फत संयुक्तपणे करण्यात यावी. तसेच, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दर 30 दिवसांनी शासनास सादर करण्यात यावा, असे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत.

अशी असणार जिल्हास्तरीय समिती

संबंधित जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असणार असून, अपर पोलिस अधीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, वैध मापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक हे समितीचे सदस्य, तर जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

पिंपरी : विजेशी संबंधित समस्या सोडवा; महावितरणकडे उद्योजकांचा तक्रारींचा पाऊस

पुण्यात हवेत आणखी तीन हजार सीसीटीव्ही ; सध्या अडीच हजार सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध

Back to top button