पिंपरी : विजेशी संबंधित समस्या सोडवा; महावितरणकडे उद्योजकांचा तक्रारींचा पाऊस | पुढारी

पिंपरी : विजेशी संबंधित समस्या सोडवा; महावितरणकडे उद्योजकांचा तक्रारींचा पाऊस

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महावितरणच्या पिंपरी व चिंचवड विभागातील खंडित वीजपुरवठ्याच्या तक्रारी प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत. या विभागातून या तक्रारींकडे दोन-दोन दिवस कोणीही लक्ष देत नाही. त्यावर उपाययोजना करणे व कायमस्वरूपी कार्यक्षम अधिकारी नेमणे, या प्रमुख मागणीसह एकूण 22 समस्या उद्योजकांनी महावितरणच्या अधिकार्‍यांकडे मांडल्या.

शहरातील औद्योगिक पट्टट्यातील वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी भोसरी विभागीय कार्यालयात महावितरणचे अधिकारी आणि पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे पदाधिकारी यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीला उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लघुउद्योग संघटनेकडून अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, संचालक प्रमोद राणे, नवनाथ वायाळ, सुहास गवस आदी उपस्थित होते. महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी याबाबत कार्यवाहीला सुरुवात करून त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

बैठकीत उद्योजकांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या

  • महावितरणच्या पिंपरी चिंचवड औद्योगिक विभागासाठी मंजूर विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) कार्यान्वित करणे तसेच नवीन डीपीआरसाठी पाठपुरावा करावा.
  • पूर्वी भोसरी विभागाचे भोसरी गावठाण व इंद्रायणीनगर असे दोन विभाग होते. त्यातील एक बंद करून भोसरी गावठाण हा परिसर इंद्रायणीनगरला जोडलेला आहे. तसे न करता पूर्वीप्रमाणेच दोन विभाग करून दोन असिस्टंट इंजिनिअर त्यासाठी नेमावे.
  • महावितरणने मनुष्यबळ दुप्पट करावे. व्हॉट्सअप ग्रुपमधील तक्रार महावितरणच्या अधिकार्‍यांनी त्या तक्रारींचे तत्काळ निवारण करावे.
  • महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी शटडाऊन घेऊन प्रतिबंधात्मक दुरुस्तीची कामे मार्गी लावावी.
  • थकीत वीजबिले भरण्यासाठी उद्योजकांना तात्काळ सुलभ हप्ते करून द्यावे.
  • महापालिकेकडून रस्ता खोदाई करतांना महवितरणच्या केबल्स तोडल्या जातात. त्यावर संयुक्त उपाययोजना करावी. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महावितरण आणि पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना यांची त्यासाठी एक संयुक्त बैठक घ्यावी.
  • पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात 6 नवीन सबस्टेशनची उभारणी करावी. भोसरी एमआयडीसी – 3, कुदळवाडी – 1, तळवडे – 1 तसेच पेठ क्रमांक 7 आणि 10 मध्ये महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी.

हेही वाचा

सातारा : केळवली धबधबा फेसाळू लागला; डोंगररांगांवर रिमझिम पाऊस

एआयसीटीईचे आता सायकल चॅलेंज ; पारितोषिक जिंकण्याची संधी

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

Back to top button