लोणावळा : द्रुतगती महामार्गात सुविधांची वानवा ; मोठा अपघात झाल्यास यंत्रणा अपुरी | पुढारी

लोणावळा : द्रुतगती महामार्गात सुविधांची वानवा ; मोठा अपघात झाल्यास यंत्रणा अपुरी

विशाल पाडाळे : 

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा :  पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मोठा अपघात झाल्यास निर्माण होणारी वाहतूक कोंडीची परिस्थिती हाताळण्यात अपयश येत आहे. या मार्गाची देखभाल आणि दुरुस्ती करणार्‍या आणि त्या नावाखाली रोजच्या रोज लाखो रुपयांचा टोल वसूल करणार्‍या आयआरबी कंपनीच्या आणि रस्ते विकास महामंडळाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मंगळवारी टँकरला लागलेली आग आणि ही परिस्थिती हाताळताना यंत्रणेला आलेले अपयश हे याचे बोलके उदाहरण आहे. महामार्गावर सुविधांचा अभाव जाणवत असून मोठा अपघात झाल्यानंतर यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

मंगळवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास मिथेनॉल हे केमिकल घेऊन जाणार्‍या टँकरला अपघात झाला आणि त्याने पेट घेतला. ही आग इतकी भयानक होती की केवळ एक किंवा दोन अग्निशामकच्या वाहनांनी आग आटोक्यात येणारी नव्हती. ही आग विझवण्यासाठी तब्बल 8 ते 9 अग्निशामकच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये आयआरबी, लोणावळा नगर परिषद, खोपोली नगर परिषद, तळेगाव नगर परिषद, आयएनएस शिवाजी, टाटा स्टील खोपोली, एमआयडीसी, पीएमआरडीए यांचा समावेश होता.

तरीदेखील ही आग विझवण्यासाठी तब्बल पाच तास लागले. शिवाय हा टँकर बाजूला करायला गेलेली क्रेनदेखील या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. वरील सर्व घटना घडत असताना या घटनेमुळे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. महामार्गावर कित्येक किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तब्बल पाच तासांपेक्षा अधिक काळ ही वाहने जागची एक इंचदेखील हलली नव्हती; त्यामुळे या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या हजारो नागरिकांचे मोठे हाल झाले. त्यातच भरीस भर म्हणून यादरम्यान तीन ते चार वेळा पावसानेदेखील हजेरी लावली. नागरिकांना, लहान मुलांना, ज्येष्ठांना पिण्याच्या पाण्याची, महिला वर्गासाठी स्वच्छतागृहाची, खाण्यापिण्याची काहीही सोय द्रुतगती महामार्गावर नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर चिडचिड सुरू झाली होती. या मार्गाने प्रवास करताना भरमसाठ टोल वसूल केला जातो, पण त्या मोबदल्यात कसलीही सोय दिली जात नसल्याबद्दल अनेक प्रवासी नाराजी व्यक्त करताना दिसत होते

वसूल केला जाणारा टोल
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर कळंबोली ते किवळे या दरम्यानचे अंतर 94.5 किलोमीटर इतके आहे. या अंतरासाठी नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन टोल दराप्रमाणे लहान वाहनांना 320 रुपये, मिनी बस आणि टेम्पो साठी 495 रुपये, बससाठी 940 रुपये, दोन एक्सल ट्रकसाठी 685 रुपये, तीन एक्सल ट्रकसाठी 1630 रुपये तर मशिनरी वाहनांसाठी 2165 रुपये इतका टोल आकाराला जातो.

मदत केंद्र व सुविधांचा तुटवडा
पुणे-मुंबई महामार्गाच्या एकूण 94.5 किलोमीटर अंतरामध्ये मुंबईकडे जाताना उर्से टोल नाका, ओझर्डे आणि ताजे येथील मॉल, त्यानंतर खालापूर टोल नाका आणि तेथील मॉल वगळता कुठेही स्वच्छतागृह किंवा वॉशरूमची सोय नाही. तसेच, वरील मॉल वगळता पिण्याचे पाणी किंवा जेवणासाठी आवश्यक सुविधा नाही. किंबहूना यापेक्षा अधिक बिकट परिस्थिती पुण्याकडील बाजूला असून खालापूर टोल नाका आणि तेथील मॉल सोडल्यावर थेट उर्से टोल नाका आणि तेथील मॉलवर ही सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय मध्यंतरी कोठेही कोणतीही सुविधा महामार्गावर उपलब्ध नाही. एवढेच नाही तर संपूर्ण महामार्गावर कोणत्याही स्वरूपाचे मदतकेंद्रदेखील नाही.

अपेक्षित सोयीसुविधा
पुणे-मुंबई महामार्गावर काही ठराविक किलोमीटर अंतरावर स्वच्छतागृह, वॉशरूम तसेच पिण्याचे पाणी आणि अल्पोपहार केंद्रांची अवश्यकता आहे. त्याशिवाय या महामार्गावर अडकल्यास बाहेर पडण्यासाठी काही ठराविक अंतरावर छेद रस्ते तसेच पर्यायी रस्ते आवश्यक आहे. एखादा मोठा अपघात झाल्यास कमीत-कमी वेळेत अपघाती वाहन बाजूला करण्याची यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. येथील महामार्ग जेवढ्या लवकर मोकळा करणे शक्य आहे, तेवढ्या लवकर तो मोकळा करायला हवा. त्यासाठी महामार्गावर सक्षम यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.

हे ही वाचा : 

पुणे : पतसंस्थेच्या शिपायाची दोन अनोळखी व्यक्तींकडून फसवणूक

Ashadhi Wari 2023 : माउलींच्या निरा स्नानाच्या तयारीचा आढावा ; आ. मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती

Back to top button