पुणे : पतसंस्थेच्या शिपायाची दोन अनोळखी व्यक्तींकडून फसवणूक | पुढारी

पुणे : पतसंस्थेच्या शिपायाची दोन अनोळखी व्यक्तींकडून फसवणूक

मंचर (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : मंचर (ता. आंबेगाव) येथील राजगुरुनगर सहकारी बँकेच्या शाखेत पैशांचा भरणा करण्यासाठी गेलेल्या मंचर येथील पतसंस्थेच्या शिपायाची दोन अनोळखी व्यक्तींनी हातचलाखी करीत 70 हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत पतसंस्थेचे शिपाई सुनील केवाळे यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील केवाळे हे मंचरच्या पतसंस्थेच्या शाखेत शिपाई या पदावर काम करीत असून, ते नेहमीप्रमाणे सकाळी कामावर आले होते. दुपारी 1:17 च्या दरम्यान पतसंस्थेच्या रोखपालाने केवाळे यांना दोन हजार रुपये किमतीच्या 100 नोटा एकूण (2 लाख रुपये) राजगुरुनगर सहकारी बँक शाखेत भरण्यासाठी दिल्या. शिपाई केवाळे हे पैसे घेऊन राजगुरुनगर सहकारी बँकेच्या शाखेमध्ये गेले असता ते रांगेत उभे होते.

दरम्यान, या वेळी त्यांच्या मागे असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी ‘आपके नोट की सीरिअल नंबर स्लिप पर लिखे है क्या?’ असे म्हणून त्यातील एका व्यक्तीने भरणा स्लिप व पैसे पाहण्यासाठी मागितले. केवाळे यांनी पैसे व स्लिप त्यांना दिली. त्यांनी पैसे मोजून पुन्हा केवाळे यांच्याकडे दिले असता ते त्यांनी रोखपाल यांच्याकडे दिले असता त्यात 100 नोटा पैकी फक्त 65 नोटा (1 लाख 30 हजार रुपये) असल्याचे रोखपाल यांनी सांगितले. त्या दोन अज्ञातांनी हातचलाखी करीत 2 हजार रुपयांच्या 35 नोटा (70 हजार रुपये) काढून घेत फसवणूक केल्याचे केवाळे यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी अज्ञात व्यक्तींचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. याबाबत मंचर पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार हगवणे करीत आहेत.

हे ही वाचा : 

Ashadhi wari 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! खानदेश, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जातात वारकरी

नगर : सरकारमुळेच दुधाला 33 रुपये भाव : मंत्री विखे

 

Back to top button