Ashadhi Wari 2023 : माउलींच्या निरा स्नानाच्या तयारीचा आढावा ; आ. मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती | पुढारी

Ashadhi Wari 2023 : माउलींच्या निरा स्नानाच्या तयारीचा आढावा ; आ. मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती

निरा : पुढारी वृत्तसेवा :  पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील निरा नदीच्या निसर्गरम्य दत्त घाटावर माउलींच्या पादुकांना रविवारी (दि. 18) निरा स्नान घालण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वाई-खंडाळ्याचे आ. मकरंद पाटील यांनी निरा नदीवरील दत्त घाटाची सोमवारी (दि. 13) संध्याकाळी सहा वाजता पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. या वेळी आ. मकरंद पाटील यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांच्या निरा स्नानावेळी चोख व्यवस्था ठेवा, वारक-यांना नदीपात्रात अंघोळीसाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्या. तसेच निरा नदीकाठाच्या परिसरातील स्वच्छता ठेवून वारकर्‍यांंची चांगली व्यवस्था ठेवा, अशा सूचना पाडेगाव ग्रामपंचायतीसह प्रशासनाला केल्या.

निरा नदीवरील नवीन पुलावर सातारा जिल्हा परिषदेने उभारलेल्या स्वागतकमानीला पालखी सोहळ्यापूर्वी तातडीने रंगरंगोटी करण्याच्या सूचना आ. मकरंद पाटील यांनी सातारा जिल्हा परिषद प्रशासनाशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून दिल्या. या वेळी पाडेगांव ( ता. खंडाळा) येथील अंगणवाडीच्या परिसरात आ. मकरंद पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या वेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, लोणंद मार्केट कमिटीचे संचालक विजयराव धायगुडे, पाडेगावच्या सरपंच अनिता मर्दाने, उपसरपंच संतोष माने, रघुनाथ धायगुडे, हरिश्चंद्र माने, शंकरराव मर्दाने, गजानन माने, रवींद्र मर्दाने, ग्रामसेविका साधना जाधव, रमेश धायगुडे यांच्यासह, पाडेगाव, बाळूपाटलाची वाडी, लोणंद येथील पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी पालखी सोहळ्यातील माउलींच्या पादुकांना निरास्नानाची चोख व्यवस्था करण्यासाठी 15 जून ते 19 जूनदरम्यान निरा नदीवरील दशक्रिया विधी घाट बंद ठेवण्यात येणार असल्याचे सूचनाफलक लावण्यात आल्याचे पाडेगाव ग्रामपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले.

Back to top button