माझा कोणी वारस नाही, देश हाच माझा परिवार : पंतप्रधान मोदी

माझा कोणी वारस नाही, देश हाच माझा परिवार : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांमध्ये असलेल्या परिवार वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढविला आहे. माझे कोणीही वारसदार नाहीत. तुम्हीच माझे वारस असून संपूर्ण देश हाच माझा परिवार असल्याचा पुनरुच्चार मोदी यांनी केला आहे.

पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील करतारनगर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझे कोणीही वारसदार नाहीत. ५० वर्षांपूर्वी मी घरदार सोडले. बालपणी घर सोडताना एक दिवस देशातील १४० कोटी जनता हाच माझा परिवार होईल, अशी कल्पनाही मी कधी केली नाही. माझे जीवन तुमच्यासाठी समर्पित आहे.

भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्षांवर पंतप्रधानांनी जोरदार हल्ला चढविला. भ्रष्टाचारात अडकलेले इंडिया आघाडीतील नेते एकापाठोपाठ एक तुरुंगात जात आहेत. एक भ्रष्ट नेता दुसऱ्या भ्रष्ट नेत्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. शाही परिवाराने भ्रष्टाचाऱ्यांना आश्रय दिला असल्याचा आरोप मोदी यांनी केला.

काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या युतीवर बोलताना मोदी यांनी दिल्ली व हरियाणात त्यांची दोस्ती तर पंजाबमध्ये कुस्ती सुरू असल्याची टीका केली. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करताना विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिल्लीला ओलीस ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. काही नेते भ्रष्टाचार संपविण्यासाठी राजकारणात आले, पण आता स्वतःच भ्रष्टाचार करून तुरुंगाची हवा खात आहेत, अशा शब्दात मोदी यांनी केजरीवाल यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर हल्ला चढविला.

दिल्लीकरांचे स्वप्न पूर्ण करणे, हाच माझा संकल्प आहे. नवी दिल्लीत आम्ही कन्वेंशन सेंटर, नवीन संसद भवनाची निर्मिती केली. दिल्लीच्या विकासासाठी मेट्रो रेल्वेच्या नवीन लाईन्स टाकल्या आहेत. त्यामुळे सर्वांना आधुनिक दिल्लीचे दर्शन घडत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांच्या काळात चार पदरी महामार्गांची संख्या दुप्पट झाली आहे.

देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीद जवानांचा सन्मान करण्यासाठी आम्ही वॉर मेमोरियलची स्थापना केली. देशासाठी सुमारे ३५ हजार पोलिस जवानांनी प्राणांची आहुती दिली. या सर्वांच्या बलिदानाचे स्मरण करून वॉर मेमोरियलच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केल्याचे मोदी यांनी सांगितले.

दिल्लीतील वायू प्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. दिल्लीसह मोठ्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस चालविल्या जात आहेत. घरोघरी सोलर प्लांट लावण्यासाठी केंद्र सरकारकडून ७५ हजार रुपये दिले जात आहेत. सोलर प्लांटच्या माध्यमातून घरातील विजेचे बील शून्यावर आणले जात असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news