पुणे : कुटुंब सर्वेक्षणाकडे सोसायट्यांची पाठ; माहिती देण्यास टाळाटाळ | पुढारी

पुणे : कुटुंब सर्वेक्षणाकडे सोसायट्यांची पाठ; माहिती देण्यास टाळाटाळ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या आदेशानुसार सध्या शहरात कुटुंब पाहणी सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. यामध्ये महापालिका हद्दीतील सर्व क्षेत्रीय कार्यालये, दवाखान्यांतर्गत 300 हून अधिक परिचारिकांच्या माध्यमातून माहिती संकलनाचे काम सुरू आहे. मात्र, शहरातील अनेक सोसायट्या माहिती देण्यास सहकार्य करीत नसल्याने सर्वेक्षणात अडचणी येत आहेत. आतापर्यंत 6 लाख 68 हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

दर वर्षी 1 एप्रिल ते 15 जून या कालावधीत सर्वेक्षण केले जाते. यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती, गर्भवती महिला, 0 ते 5 वर्षे वयाची बालके, 30 वर्षांवरील नागरिकांची असंसर्गजन्य आजारांबद्दलची माहिती, कुटुंबनियोजन साधने आदींची नोंद घेण्यात येत आहे. लहान-मोठ्या वस्त्या, झोपडपट्टी परिसर अशा ठिकाणचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे.

शहरातील अनेक सोसायट्या परिचारिकांना आतमध्ये प्रवेश करू देत नाहीत. परिचारिकांना व्यवस्थित माहिती देत नाहीत किंवा सरळ माहिती देणे नाकारून दार लावून घेतात, असा अनुभव परिचारिकांना येत आहे. आरोग्य माहिती संकलन हे अत्यंत महत्त्वाचे काम असून, त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सर्वेक्षणातील माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वेक्षणातील माहिती संपूर्णपणे गोपनीय ठेवली जाते आणि इतर कोणत्याही विभागाला किंवा संस्थेला दिली जात नाही. संकलित माहितीच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांचा, मोफत औषधांचा लाभ घेता येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सर्वेक्षणाला सहकार्य करावे.

               डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

सर्वेक्षणाची सद्य:स्थिती : (1 एप्रिल ते 20 मेपर्यंत)
परिमंडल लोकसंख्या घरे
1 6,13,103 1,55,255
2 4,67,957 1,33,303
3 5,10,175 1,50,825
4 4,75,112 1,19,263
5 4,11,509 1,10,223
एकूण 24,77,856 6,68,869

Back to top button