अहमदनगर : लग्नात चोरी करणार्‍या टोळीला बेड्या | पुढारी

अहमदनगर : लग्नात चोरी करणार्‍या टोळीला बेड्या

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : लग्न समारंभातून रोख तसेच मोबाईल चोरी करणार्‍या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सुपा टोलनाकाजवळ सापळा लावून एलसीबीच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून रोख व मोबाईल असा चोरीचा दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

प्रदीप कालुसिंग दपानी (वय 24, रा. कडीयासासी, जि.राजगड, मध्यप्रदेश), अमित पन्नासिंग सासी (वय 19, रा. लक्ष्मीपुरा, ता. गोगर, जि.बारहा, राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत. लग्न समारंभात चोरी करणारे आरोपी दुचाकीवरून पुण्याहून नगरकडे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुपा टोल नाका परिसरात सापळा लावला होता. मध्यप्रदेश पासींगच्या दुचाकीवरून दोन जण येताना दिसताच त्यांना थांबविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.

दोघेही दुचाकी सोडून पळून जात असताना पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडती घेतली असता आठ हजार 800 रोख आणि दोन मोबाईल पोलिसांच्या हाती लागले. शहरातील बंधन लॉन्स येथील लग्न समारंभामधून राख चोरी केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. तसेच, एक लाख रुपये वसंत कुमार (रा. कडीयासासी, मध्यप्रदेश) व कालुसिंह (रा. लक्ष्मीपूरा, राजस्थान) यांच्या बँक खात्यात पाठवली व चोरीचे मोबाईल फेकून दिल्याचे आरोपींनी सांगितले.

तसेच, इतर साथीदारांबाबात विचारपूस केली असता भूपेंद्रसिंह अर्जुनसिंह भानेरीया (रा.कडीयासासी, मध्यप्रदेश) याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे सांगितल्याने त्याच्या ताब्यातून 80 हजार रुपये रोख रक्कम 60 हजार रुपये किमतीची दुचाकी व चार हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एक लाख 44 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोसिलांनी जप्त करून आरोपीला तोफखाना पोलिसांच्या हवाली केले.

पुढील तपास तोफखाना पोलिस करीत आहेत. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस हवालदार मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, संतोष खैरे, रोहित मिसाळ, रणजित जाधव, आकाश काळे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, फुरकान शेख, संभाजी कोतकर यांनी ही कारवाई केली.

महिलेची पर्स गेली होती चोरीला

वडगाव गुप्ता रस्त्यावरील बंधन लॉन येथील लग्नातून यमुना लांडगे (वय 75, रा. लांडगेमळा,ता.नगर) या महिलेची पर्स 12 मे रोजी चोरी गेली होती. दोन लाख 10 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Back to top button