शास्त्रज्ञांनी शोधला पृथ्वीवरील सर्वात जुना जीव | पुढारी

शास्त्रज्ञांनी शोधला पृथ्वीवरील सर्वात जुना जीव

न्यूयॉर्क : कीटक, मासे आणि फुलपाखरे यांची गणना सर्वात जुन्या जीवांमध्ये केली जाते. परंतु, अलीकडील शोधामुळे शास्त्रज्ञसुद्धा आश्चर्याने थक्क झाले आहेत. शास्त्रज्ञांनी 700 दशलक्ष वर्षांपूर्वी जन्मलेल्या जगातील सर्वात जुन्या जीवाबद्दल माहिती उघड केली आहे. जेलीफिशसारख्या दिसणार्‍या या प्राण्याचे नाव टिनोफोर असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. हा जीव 700 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. अहवालात म्हटले आहे की, डायनासोरच्याही आधी याची उत्पत्ती झाली होती. हा जीव 23 कोटी वर्षे जुना असल्याचे सांगितले जात आहे. बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी त्यांच्या एका संशोधनात सांगितले आहे की, पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्राण्यांशी मिळताजुळता जीव हा टिनोफोर आहे. सध्या तो समुद्रात तरंगताना दिसतो.

सागरी प्राण्यांचे वय हा नेहमीच शास्त्रज्ञांमध्ये चर्चेचा विषय राहिले आहे. याआधीही शास्त्रज्ञांनी समुद्रात सापडलेल्या स्पंजवर आपली बाजू मांडली होती. अमेरिकन शास्त्रज्ञांच्या या नव्या संशोधनामुळे 600 दशलक्ष वर्षांपूर्वी जन्मलेल्या पहिल्या जीवांमध्ये समुद्री स्पंज असल्याच्या दाव्याचे खंडन करण्यात आले आहे. संशोधन अहवालानुसार, टिनोफोर हा पाण्यात राहणारा एक विशेष प्रकारचा जीव आहे. त्याला असलेल्या परांच्या साहाय्याने तो पाण्यात पुढे सरकतो. त्यांच्या मदतीने तो 6 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार करू शकतो. हीच त्याची खासियत आहे.

संशोधक डॅनियल रोकसर म्हणतात, सर्व सजीवांचा सर्वात जुना आणि सामान्य पूर्वज सुमारे 60 ते 700 दशलक्ष वर्षे जुना आहे; पण ते मऊ शरीराचे प्राणी असल्यामुळे त्यांच्या जीवाश्म नोंदी मिळत नाहीत. तथापि, त्यांच्या पूर्वजांबद्दल जाणून घेण्यासाठी आपण सध्या जिवंत प्राण्यांची तुलना करून माहिती गोळा करू शकतो. संशोधकांच्या टीमचे म्हणणे आहे की, कीटक, माश्या, मोलस्क, स्टारफिश आणि काही पृष्ठवंशी प्राणी सर्वात जुन्या जीवांमध्ये गणले जातात; पण तसे नाही. संशोधनानुसार, कीटकांची उत्पत्ती 500 दशलक्ष वर्षांपूर्वी झाली. लोकांना जुन्या प्राण्यांबद्दल विचारले, तर ते कदाचित हीच नावे सांगतील. मात्र, आतापर्यंत केलेले संशोधन वेगळीच माहिती देते. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, टिनोफोर हा सर्वात जुन्या जीवांपैकी एक आहे.

या संशोधनामुळे समुद्री जीवांबद्दल अनेक प्रकारची माहिती मिळते आणि ती भविष्यात खूप उपयोगी ठरू शकते. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जलचर जीवांशी संबंधित आणखी अनेक प्रकारची माहिती आता नव्याने समोर येण्याची शक्यता आहे.

Back to top button