‘या’ मंदिरात कालीमातेला दाखवला जातो नूडल्स, मोमोजचा नैवेद्य | पुढारी

‘या’ मंदिरात कालीमातेला दाखवला जातो नूडल्स, मोमोजचा नैवेद्य

कोलकाता : ‘जैसा देश, वैसा भेष’ अशी एक म्हण आपल्या राष्ट्रभाषेत आहे. आपण जिथे राहतो तेथील वेश, चालीरीती आणि खाणे-पिणेही स्वीकारत असतो. हे केवळ माणसांबाबतच नव्हे, तर देवदेवतांबाबतही खरे ठरेल, असे कुणाला एरवी वाटले नसते. मात्र, कोलकाताच्या ‘चायना टाऊन’मध्ये असलेल्या कालीमंदिरात त्याची प्रचिती येते. या परिसरात मोठ्या संख्येने मूळ चिनी नागरिक राहतात व त्यांची कालीमातेवर अत्यंत श्रद्धाही आहेे; मात्र ते देवीमातेला नैवेद्य आपल्याच पद्धतीने दाखवतात. या नैवेद्यात चक्क नूडल्स, चॉप्सी, फ्राईड राईस आणि मोमोज असे‘चायनीज’ पदार्थ असतात!

आपल्या देशातील विविधता ही थक्क करणारीच आहे. त्यामध्ये अशा प्रकारच्या वैविध्याचा आणि तिला सामावून घेणार्‍या आपल्या संस्कृतीचा मोठेपणा दिसून येतो. पश्चिम बंगाल ही नेहमीच शक्तिपूजेची भूमी राहिलेली आहे. याठिकाणी कालीमातेची अनेक मंदिरे आहेत. मातेच्या नैवेद्यामध्ये सर्वत्र विशिष्ट पदार्थांचा समावेश असतो. मात्र, राजधानी कोलकात्यातील ‘तांग्रा’ नावाच्या ठिकाणी असलेल्या कालीमंदिरात देवीला चिनी पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.

चीनच्या गृहयुद्धावेळी तेथून परागंदा होऊन कोलकात्यात आश्रयाला आलेले अनेक लोक याठिकाणी राहतात. या लोकांनी अनेक भारतीय परंपरा, श्रद्धास्थाने यांना आपल्या जीवनात स्थान दिलेले आहे. अर्थातच कोणत्याही बंगाली माणसाप्रमाणे त्यांचीही कालीमातेवर नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे ते मातेला आपल्या घरी जे शिजवले जाते त्याच पदार्थांचा नैवेद्यही दाखवतात. ‘देव भावाचा भुकेला’ असे म्हटले जाते. त्यामुळे अशा चिनी पदार्थांचा नैवेद्यही स्वीकारला गेला आणि आता तर तो तिथे लोेकप्रियही झाला आहे. या ठिकाणी इंडो-चायनीज नैवेद्य दाखवून त्याचा प्रसादही लोकांना दिला जातो.

Back to top button