Dengue In Parbhani : जिंतुर तालुक्यातील ‘या’ गावात डेंगूचे थैमान; एक वर्षाच्या बालकाचा मृत्यू | पुढारी

Dengue In Parbhani : जिंतुर तालुक्यातील 'या' गावात डेंगूचे थैमान; एक वर्षाच्या बालकाचा मृत्यू

कौसडी; पुढारी वृत्तसेवा : जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे डेंगूने थैमान घातले आहे. एक वर्षाच्या बालकाचा डेंगूची लागण होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कौसडीमध्ये 20 एप्रिल पासून ते 10 मे पर्यंत अंदाजे 15 रुग्ण डेंगूचे पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यातील काही रुग्ण परभणी, नांदेड या शहरात उपचार घेऊन आले तर काही उपचार घेत आहे. (Dengue In Parbhani)

गावातील नाले, गटारी तुडुंब भरल्याने गावातील ग्रामस्थांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील काही भागातील तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई केली होती, परंतु काही भागातील नाले व गटारी तसेच ठेवण्यात आले होते. या अवकाळी पावसामुळे नाले व गटारी पुन्हा तुडुंब भरले आहेत. गटारी व नाल्यांमधील पाणी रस्त्यावर येत असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. गावातील मेन रोड, कुरेशी गल्ली, हराळे गल्ली, हिवत गल्ली, ख्वाजा गल्ली, बहीरट गल्ली, दलित वस्ती, जिवणे गल्ली, नाईकवाड गल्ली, पठाण मोहल्ला, वंजार गल्ली, धनगर गल्ली, बसवेश्वर नगर यासह इतर परिसरात नाल्या व गटारी तुडुंब भरल्या आहे. हे नाल्या व गटारी ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ स्वच्छ करून धूर फवारणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. (Dengue In Parbhani)

ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता अभियान राबवण्याची गरज निर्माण झाली असून गावात धूर फवारणी तात्काळ करावी व आरोग्य विभागाने डेंगू बद्दल जनजागृती करावी.
– संतोष हराळे, ग्रामस्थ कौसडी

गावातील काही भागात डेंग्यूसदृश रुग्ण असल्याची माहिती मिळाल्यानंतर गावातील नागरिकांनी आपल्या घरातील पनिसाठे वेळोवेळी स्वच्छ व घासून पुसून स्वच्छ करावेत . कुळेरमधले पाणी 4-5 दिवसाला स्वच्छ करून भरण्यात यावे , गावातील नाली गटारे साफसफाई करून पाणी वाहते करावे जेणेकरून डासांची पैदास होणार नाही आणि डासामुळे होणारे आजार जसे की डेंग्यू व इतर डासापासून होणारे आजार मलेरिया , जापनीज मेंनदुज्वर यासारखे आजार होणार नाहीत याची काळजी गावातील नागरिकांनी घ्यावी.

त्याअनुषंगाने गावामध्ये जलद ताप रुग्ण सर्वेक्षण चालू करण्यात येईल व संशयित रुग्णाचे रक्त जल नमुने घेण्यात येऊन ते तपासणीसाठी विषाणूजन्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतील तरी नागरिकांनी थोडा ही ताप असेल तर प्रा.आ.केंद्रात येऊन तपासणी करून घ्यावी.
– डॉ.ए.ए.जाधव, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कौसडी

हेही वाचा

Back to top button