मतांसाठी उद्धव ठाकरेंनी लाचारी पत्करली : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

मतांसाठी उद्धव ठाकरेंनी लाचारी पत्करली : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा, ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी युती तोडून काँग्रेसचा हात धरला, त्याच दिवशी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार गमावला आहे. त्यांनी मतांसाठी लाचारी पत्करली आहे. बाळासाहेबांची मालमत्ता ही आज  त्यांच्याकडे असली तरी त्यांच्या विचारांचा वारसा आमच्याकडे असल्याने खरी शिव सेनाही आपल्याकडे आहे. त्यांची शिवसेना नकली आहे. भलेही उद्धव ठाकरे काँग्रेसला मतदान करोत. पण सच्चा शिवसैनिक जीव गेला तरी काँग्रेसला मतदान करणार नाहीत, असा हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चढविला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवतीर्थावरून तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो अशी साद घालत होते. शिव- सेनाप्रमुखांची ही गर्जना राज्यात आणि देशात गाजत होती. पण उद्धव ठाकरे यांना आता हिंदू म्हणून घ्यायची देखील लाज वाटू लागली आहे. हिंदू बंधू-भगिनींनो म्हणायची आता त्यांच्यात हिम्मत राहिली नाही. हिंदुहृदयसम्राट म्हणायला त्यांची जीभ कचरू लागली आहे. त्यांची ही लाचारी मतांसाठी आहे. माणूस मतांसाठी किती बदलू शकतो, हे आज पाहू शकतो. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल भरभरून प्रशंसा करणारे आज त्यांच्यावर टीका करत आहेत. आपण सरडे अनेक बघितले पण इतक्या झपाट्याने रंग बदलणारा सरडा पाहिला नाही, अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

बाळासाहेबांचे विचार हीच आमची खरी आमची संपत्ती आहे. आज बाळासाहेबांचा फोटो आणि त्याच्या खाली काँग्रेसच्या हाताचा पंजा दिसतो हे दुर्दैव आहे. बाळासाहेबांच्या मताचा अधिकार ज्या काँग्रेसने काढून घेतला, त्याच काँग्रेससाठी उद्धव ठाकरे निर्लज्जपणे मते मागत आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरे यांना राहिलेला नाही, असे शरसंधान एकनाथ शिंदे यांनी साधले. कामटे, ओंबळे यांनी मुंबईसाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्या शहिदांचा तुम्ही आज अपमान करत आहात. त्यांच्या बलिदानावर तुम्ही आज प्रश्नचिन्ह लावत आहात. आज मतांसाठी तुम्ही पाकिस्तानची भाषा बोलत आहात. तुमच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे, याकूब मेमन आणि मुसाचे कार्यकर्ते दिसत आहेत. पण, दहशतवादी हल्ल्यात हजारो मुंबईकरांचे बळी गेले ते मुंबईकर विसरलेले नाहीत हे लक्षात ठेवा, असे शिंदे यांनी सांगितले.

पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आल्यानंतर मुंबईवर एकही दहशतवादी हल्ला झाला नाही आणि होणारही नाही. कारण मुंबईवर हल्ला झाला तर मोदी घरात घुसून मारतील हे पाकिस्तानला माहित आहे. मोदी गेले तर गुजरात गेले असे बाळासाहेब म्हणाले होते. आज बाळासाहेब असते तर मोदी गेले तर देश जाईल असे म्हणाले असते. पण आज उद्धव ठाकरे काहीही म्हणत असतील तर देशात मोदीच येणार आहेत, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा 

Back to top button