Shraddha Walkar murder | श्रद्धा वालकर हत्या प्रकरण; दिल्लीतील कोर्ट आज आफताब पूनावालावर आरोप निश्चित करणार | पुढारी

Shraddha Walkar murder | श्रद्धा वालकर हत्या प्रकरण; दिल्लीतील कोर्ट आज आफताब पूनावालावर आरोप निश्चित करणार

पुढारी ऑनलाईन : श्रद्धा वालकर हिचा गळा दाबून खून आणि तिच्या शरीराचे तुकडे केल्याचा आरोप (Shraddha Walkar murder) असलेल्या आफताब अमीन पूनावाला (Aaftab Amin Poonawala) याच्या विरुद्ध आरोप निश्चित करण्याबाबत दिल्लीतील साकेत न्यायालय आज मंगळवारी आदेश देण्याची शक्यता आहे.

वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची तिचा लिव्ह इनमध्ये राहणारा पार्टनर आफताब अमीन पूनावाला (२८) याने दिल्लीत त्याच्या राहत्या घरी श्रद्धाची हत्या केली होती. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते फ्रिजमध्ये ठेवून तब्बल तीन आठवड्यांत टप्प्याटप्याने मृतदेहाचे तुकडे दिल्लीतील जंगलात टाकत, त्याची विल्हेवाट लावली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून तपास करण्यात आला. या प्रकरणी अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

२९ एप्रिल रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल पाहुजा यांनी या प्रकरणाची सुनावणी घेणारे संबंधित न्यायाधीश रजेवर असल्याचे लक्षात घेऊन पूनावाला यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली होती. दरम्यान, रितीरिवाजानुसार आपल्या मुलीचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात यावे, अशी विनंती पीडितेचे वडील विकास वालकर यांनी केलेल्या अर्जावरील सुनावणीही न्यायालयाने ९ मेपर्यंत तहकूब केली होती.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनीषा खुराणा कक्कर यांनी १५ एप्रिल रोजी फिर्यादी वकिलांचा तसेच आरोप निश्चित करण्यावरील युक्तिवाद ऐकल्यानंतर २९ एप्रिलला निकाल राखून ठेवला होता. श्रद्धा वालकर हिच्या वडिलांच्या अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी तपास यंत्रणेने १५ एप्रिलला वेळ मागितला होता.

श्रद्धा हत्या प्रकरणी पूनावाला याच्यावर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आयपीसीच्या कलम ३०२ (हत्या) आणि २०१ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी २४ जानेवारी रोजी ६,६२९ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.

गेल्या वर्षी १८ मे रोजी आफताबने श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केला होता, त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या घरी तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. कोणताही पुरावा मिळू नये म्हणून त्याने मृतदेहाचे तुकडे दिल्लीतील जंगलात टप्प्याटप्याने फेकून दिले होते.

हे ही वाचा :

Back to top button