Shraddha Walkar murder case | श्रद्धाची अंगठी सापडली, हत्येनंतर आफताबने गिफ्ट केली होती दुसऱ्या गर्लफ्रेंडला! | पुढारी

Shraddha Walkar murder case | श्रद्धाची अंगठी सापडली, हत्येनंतर आफताबने गिफ्ट केली होती दुसऱ्या गर्लफ्रेंडला!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी (Shraddha Walkar murder case) आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रद्धा वालकरचा खून केल्यानंतर तिची अंगठी तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याने दुसऱ्या एका महिलेला दिली होती. ही अंगठी पोलिसांनी जप्त केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या संदर्भात श्रद्धाचे वडील आणि ज्या महिलेला आफताबने श्रद्धाची अंगठी दिली त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त द टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

सूत्रांनी पुढे सांगितले की, आफताब त्या महिलेशी बोलत असताना त्याचे वर्तन सामान्य असायचे आणि तिला फ्लॅटमध्ये श्रद्धाचा खून झाला आहे हे कळू नये याची तो खबरदारी घ्यायचा. ती जेव्हा त्याच्या घरातून बाहेर पडली तेव्हा जाताना त्याने तिला अंगठी दिली, अशी माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. पोलिसांना संशय आहे की त्या महिलेला त्याच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये आणण्यापूर्वी आफताबने फ्लॅटची पूर्ण साफसफाई केली होती.

पोलिसांना मेहरौली येथील जंगलातून काही केसांचे पुंजके सापडले आहेत. ते फॉरेन्सिक तपासणी पाठवण्यात आले आहेत. या हत्येनंतर आफताबने श्रद्धाचे केस कापून त्याची विल्हेवाट दिल्ली आणि गुडगावमध्ये लावल्याचा संशय आहे. पोलिसांनी सांगितले की त्यांना आणखी एक धारदार शस्त्र सापडले आहे ज्याचा वापर शरीराचे तुकडे करण्यासाठी केला जाऊ शकतो. तपास पथकाने नुकतेच आफताबच्या फ्लॅटच्या झडतीदरम्यान पाच चाकू जप्त केले होते आणि ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले होते. “गुडगाव आणि दिल्लीतील जंगल परिसरात शोध घेत असताना आणखी काही करवतासारख्या वस्तू सापडल्या आहेत. त्या देखील एफएसएलकडे पाठवल्या जाणार आहेत,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, आफताबला ड्रग्ज पुरवणाऱ्या एका व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून सुरतमध्ये अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. फैजल मोमीन हादेखील आफताबचा मित्र आहे. तो वसईतील घरी त्याला ड्रग्ज पुरवत असे, असा पोलिसांना संशय आहे.

आफताबच्या पॉलिग्राफ चाचण्यांचे प्राथमिक अहवाल प्राप्त झाले आहेत. आता पोलीस नार्को टेस्टसाठी एक नवीन प्रश्नावली तयार करत आहेत ज्यामध्ये शस्त्रे आणि शरीराच्या अवयवांच्या विल्हेवाटीच्या प्रश्नांचा समावेश आहे. आफताबने पॉलिग्राफ चाचणीदरम्यान आपल्याला ताप आल्याची तक्रार केली होती, पण तिहार येथील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली असता तो तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले. तुरुंगातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन कैद्यांशी आणि तुरुंगातील कर्मचाऱ्यांशी तो न खोकता बोलत असल्याचे दिसून आले आहे.

श्रद्धाचे वडील आणि तिच्या चुलत भावासह कुटुंबीयांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी संध्याकाळी भेट घेतली होती. तिच्या वडिलांनी मेहरौली पोलीस ठाण्यात आपला जबाब दिला आहे. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. (Shraddha Walkar murder case)

हे ही वाचा :

Back to top button