Shraddha Walkar murder Case | श्रद्धाच्या वडिलांचा आक्रोश, आफताबला फासावर लटकवा | पुढारी

Shraddha Walkar murder Case | श्रद्धाच्या वडिलांचा आक्रोश, आफताबला फासावर लटकवा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; वसईच्या २६ वर्षीय श्रद्धा वालकरचा क्रूर खून (Shraddha Walkar murder Case) करून तिच्या शरिराचे ३५ तुकडे करणार्‍या नराधम आफताब पूनावालाची आता नार्को चाचणी होणार आहे. श्रद्धाची क्रूरपणे हत्या झाल्याचे उघड झाल्याने तिच्या कुटुंबियांनी आक्रोश केला आहे. ANI शी बोलताना श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ”आफताब कधी खोटे बोलतो तर कधी खरे बोलतो हे दिल्ली पोलिसांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्या नार्को चाचणीसाठी अर्ज केला. मला वाटते की न्याय मिळेल. जर त्याने गुन्हा केला असेल तर त्याला फाशी द्यायला हवी. तो खोटं बोलतोय असं मला नेहमीच वाटत होतं. याबाबत मी मुंबई आणि दिल्ली पोलिसांना सांगितलं होतं,” असे विकास वालकर यांनी म्हटले आहे.

आफताब हा एका सराईत गुन्हेगारासारखा असून त्याने गेल्या ५-६ महिन्यांत पुरावे नष्ट केले आहेत. त्यामुळे सत्य समोर आणण्यास पोलिसांना थोडी अडचण येणार आहे. आफताबला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे श्रद्धाचे वडील विकास यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.

पालघर जिल्ह्यातील वसईच्या श्रद्धा वालकर खून प्रकरणात न्यायालयाने आफताबची नार्को टेस्ट करण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, श्रद्धाच्या फोनवरून आफताबने मेहरोली येथे खून केल्यानंतर तिच्या खात्यातून ५४ हजार रुपये आपल्या खात्यात वळवल्याचे समोर आले आहे. त्यावेळचे लोकेशन आफताब राहत असलेल्या मेहरोली भागाचेच असल्याचे उघड होताच आफताबचे भांडे फुटले.

श्रद्धा वालकरचा खून केल्याची कबुली दिल्यानंतर आफताब पूनावाला याला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. त्याने केलेले ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडियावरील चॅटमधील तपशील तसेच काही विसंगत असलेली माहिती याबाबत तपासणी करायची असल्याने आफताबची नार्को टेस्ट करू द्यावी, अशी विनंती पोलिसांनी साकेत कोर्टासमोर केली.
न्यायालयाने त्याला मंजुरी दिली.

दरम्यान, या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाच्या मोबाईलबाबत आफताबने दिलेल्या विसंगत माहितीतून सार्‍या प्रकाराचा भंडाफोड झाला.

१८ मे रोजी श्रद्धाचा खून झाल्यानंतर आणि एकेक करीत तिच्या शरीराचे तुकडे फेकून दिल्यानंतर आफताब निर्धास्त झाला. ऑक्टोबर महिन्यात तिच्या वडिलांनी पोलिसांना, आफताबची चौकशी केली तेव्हा त्याने २२ मे रोजी श्रद्धा भांडण झाल्यानंतर रागारागात घर सोडून गेली. जाताना तिने फक्त मोबाईल सोबत ठेवला, तिचे कपडे व इतर सामान घरीच आहे, असे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी श्रद्धाच्या मोबाईलचे ट्रॅकिंग सुरू केले. कॉल्सचा तपशील आणि लोकेशन्स तपासले. त्यात २२ आणि २६ मे रोजी श्रद्धाच्या खात्यातून ५४ हजार रुपये आफताबच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे समोर आले. यावेळी बँकेच्या अ‍ॅपवर फोनचे नोंदले गेलेले लोकेशन मेहरोलीचेच होते. शिवाय, श्रद्धाच्या इन्स्टाग्रामवरील चॅटची झाडाझडती घेतली असता, त्यावेळीही लोकेशन मेहरोलीचेच होते. यामुळे संशय बळावल्यावर पोलिसांनी पुन्हा चौकशी केली. १८ मे रोजी श्रद्धा निघून गेल्यावर मेहरोलीतूनच तिने पैसे कसे खात्यात जमा केले, असे विचारताच आफताबला आपले भांडे फुटल्याचे समजले आणि तो रडू लागला. नंतर त्याने सगळा कबुलीजबाब दिला, असे पोलिसांनी सांगितले.

आधीच खून करणार होता

मला कुणाचे फोन आले आणि मी जास्त वेळ बोललो की, श्रद्धाला संशय यायचा आणि भांडायची. १८ तारखेच्या आधीच तिचा खून करणार होतो; पण आमचे भांडण झाल्यावर ती रडायला लागली; मग मी प्लॅन रद्द केला, असेही आफताबने जबाबात म्हटले आहे.

शिरवगळता १३ तुकड्यांचे अवशेष सापडले

दरम्यान, आफताबच्या जबाबानंतर पोलिसांनी श्रद्धाच्या शरीराचे अवयव शोधण्याचे काम हाती घेतले. आतापर्यंत श्रद्धाच्या शरीराच्या १३ तुकड्यांचे अवशेष पोलिसांनी हस्तगत केले. त्यांची ‘डीएनए’ चाचणी केली जाणार आहे. मात्र, श्रद्धाचे शिर अद्याप हाती लागलेले नाही.

हे ही वाचा :

Back to top button