सिंघू बॉर्डर : हात पाय तोडून युवकाच्या हत्येप्रकरणी निहंग शीख इसमास अटक | पुढारी

सिंघू बॉर्डर : हात पाय तोडून युवकाच्या हत्येप्रकरणी निहंग शीख इसमास अटक

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरु असलेल्या सिंघू बॉर्डरवर पंजाबमधील एका युवकाची दोन दिवसांपूर्वी निर्घृण हत्या झाली होती. युवकाच्या हत्येप्रकरणी दिल्‍ली पोलिसांनी एका निहंग शीख इसमास अटक केली आहे. सर्वजीत सिंग असे आरोपीचे नाव असून लखबीर सिंग नावाच्या युवकाची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे.

गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात अन्य निहंग शिखांसोबत सर्वजीत सिंघू बॉर्डरवर आला होता. लखबीर सिंग याने काही धर्मग्रंथाचा अपमान केला होता, त्यामुळे त्याची हत्या केल्याचे सर्वजीत याने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले.

लखबीर याची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. त्याचे हात-पाय तोडण्यात आले होते तर हात जवळच्या बॅरेकेडवर लटकविण्यात आले होते. पंजाबमधील तरणतारण येथे राहणार्‍या लखबीरचे आई-वडील हयात असून पत्नीही त्याला सोडून गेलेली आहे. त्याच्यामागे तीन लहान मुली आहेत. युवकाच्या हत्या प्रकरणाशी शेतकरी संघटनांचा काहीही संबंध नसल्याचे संयुक्‍त किसान मोर्चाने याआधीच स्पष्ट केलेले आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button