पंजाब काँग्रेस: अखेर सिद्धू यांचा राजीनामा मागे; काँग्रेसमधील बंड तूर्त शमले | पुढारी

पंजाब काँग्रेस: अखेर सिद्धू यांचा राजीनामा मागे; काँग्रेसमधील बंड तूर्त शमले

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन:

पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ननवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्‍यक्ष पदाचा राजीनामा अखेर १८ दिवसांनंतर मागे घेतला आहे. त्‍यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. यानंतर राजीनामा मागे घेण्‍याचा निर्णय घेतला, अशी माहिती पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांनी माध्यमांना दिली.

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर  मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिल्यानंतर सिद्धू नाराज होते.  चरणजित चन्नी यांना मुख्यमंत्री केल्यानंतर अचानक सिद्धू यांनी प्रदेशाध्‍यक्षपदाचा राजीनामा दिला होता. वास्तविक अमरिंदर सिंग यांना हटविण्यात सिद्धू यांचा मोठा हात होता. त्यामुळे हे पद आपल्यालाच मिळेल, असे त्‍यांना वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. शिवाय समर्थक आमदारांना मंत्रिपदे आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून चन्नी यांच्यासोबत त्यांचा वाद झाला होता. त्यामुळे त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. ते काँग्रेस सोडतील, अशी शक्‍यताही वर्तवली जात हाेती.

सिद्धू यांनी शुक्रवारी ( दि.१५ ) राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल और हरीश रावत यांचीही भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेण्याचे संकेत दिले हाेते.

सिद्धू यांनी पंजाब प्रदेशाध्‍यक्ष पदाचा २८ सप्टेंबर रोजी राजीनामा दिला हाेता. तत्पूर्वी त्यांना केंद्रीय नेतृत्वाने त्यांना प्रदेशाध्यक्ष केले होते. त्यांनाच त्यांनी आव्हान दिले होते. त्यामुळे पुढील काळात सिद्धू काय करणार याकडेही लक्ष लागले होते.

ज्या दिवशी कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांनी पक्षात प्रवेश केला. त्याच दिवशी सिद्धूने पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसला धक्का दिला होता.त्यामुळे सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी प्रचंड नाराज होत्या. शुक्रवारी  राहुल गांधी यांच्याशी बैठक झाल्यानंतर सिद्धूने माध्यमांशी संवाद साधला, राहुल गांधी यांच्याशी मी चर्चा केली. त्या बैठकीत माझ्या सर्व शंकांचे निरसन झाल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

हेही वाचलं का? 

Back to top button