कोल्हापूर : राजापूर बंधारा ऐन उन्हाळ्यात ओव्हरफ्लो; 450 क्युसेक्सने विसर्ग सुरु | पुढारी

कोल्हापूर : राजापूर बंधारा ऐन उन्हाळ्यात ओव्हरफ्लो; 450 क्युसेक्सने विसर्ग सुरु

कुरुंदवाड, पुढारी वृत्तसेवा : राजापूर (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीवरील बंधार्‍याचे सर्वच बरगे बसवून 14 फूट पाण्याची लेवल करण्यात आली होती. मागील पंधरा दिवसांत झालेल्या वळवाच्या पावसामुळे शेतीचा पाणी उपसा पूर्णपणे बंद होता. दरम्यान, पाणी उपसा न झाल्यामुळे पाणी पातळी 16 फूट झाली आहे. रविवारी (दि.26) दुपारी बारा वाजता बंधारा ओव्हरफ्लो होऊन बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षी दुसऱ्यांदा बंधारा ओव्हरफ्लो होऊन कर्नाटकच्या दिशेने पाणी वाहत चालले आहे. पाण्याची चातकासारखी वाट पाहणार्‍या कर्नाटकातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर बंधाऱ्यावरील संरक्षणासाठी असलेल्या पोलीस तसेच पाटबंधारे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी झाला आहे.

कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा हा महाराष्ट्राचा शेवटचा बंधारा असून शिरोळ तालुक्यासाठी वरदायिनी आहे. या बंधार्‍याच्या बॅक वॉटरमुळे जवळपास सर्व शिरोळ तालुक्याची शेती तसेच पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण होते. कर्नाटकाला त्यांच्या मागणीनुसार प्रत्येक वर्षी बंधाऱ्यातून सुमारे २ टीएमसी पाणी देण्यात येते. मात्र, यंदा कमी पावसामुळे पाण्याची टंचाई गृहीत धरुन बंधार्‍याचे सर्व बरगे घालण्यात आले आहेत.

16 दिवसांत तीनवेळा वळीव जोरदारपणे बरसल्याने शेतीच्या पाण्याचा उपसा झाला नाही. 450 क्यूसेक्सने पाण्याचा कर्नाटकात विसर्ग होत आहे. बंधाऱ्यावरील वाहतूक सुरू करण्यासाठी चार दरवाजाचे बरगे 1 फुटाने कमी असल्याची माहिती पाटबंधारे अभियंता रोहित दानोळे यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button