१० साल बाद..! कोलकाता IPL चॅम्‍पियन, हैदराबादवर ८ विकेट राखून विजय | पुढारी

१० साल बाद..! कोलकाता IPL चॅम्‍पियन, हैदराबादवर ८ विकेट राखून विजय

चेन्नई; वृत्तसंस्था : कोलकाता नाईट रायडर्सने 10 वर्षांचा दुष्काळ संपवताना इंडियन प्रीमिअर लीगचे तिसर्‍यांदा विजेतेपद पटकावले. 2012 व 2014 मध्ये त्यांनी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली ‘आयपीएल’ चषक उंचावला होता आणि आता गौतम गंभीर हा त्यांचा मेंटॉर आहे. कर्णधार व मेंटॉर म्हणून ‘आयपीएल’ ट्रॉफी जिंकणारा गंभीर हा पहिलाच खेळाडू आहे. ‘आयपीएल 2024’च्या फायनलमध्ये ‘केकेआर’ने उत्तम गोलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादचा 8 विकेटस् आणि तब्बल 57 चेंडू राखून सहज पराभव केला. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर वेंकटेश अय्यरने एकहाती सामना जिंकून दिला.

चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय सनरायझर्सच्या अंगलट आला. स्टार्कने पहिल्याच षटकात अभिषेक शर्माचा त्रिफळा उडवला. त्यानंतर ट्रॅव्हिस हेडने (0) पुन्हा निराश केले व राहुल त्रिपाठी (9) हाही फेल गेला. स्टार्कसोबत वैभव अरोरा व हर्षित राणा यांनी पहिल्या 10 षटकांत उत्तम मारा करताना हैदराबादचा निम्मा संघ 62 धावांत तंबूत पाठवला.

आंद्रे रसेलने सलग दोन षटकांत दोन विकेटस् घेऊन हैदराबादची दयनीय अवस्था केली. वरुण चक्रवर्थीने 12 व्या षटकात शाहबाज अहमदला (8) बाद केले. हेन्रिक क्लासेन (16) हा शेवटचा आशादायी फलंदाज मैदानावर उभा होता. परंतु, हर्षितच्या चेंडूवर बॅटची किनार घेत तो त्रिफळाचीत झाला. पॅट कमिन्सचा सोपा झेल स्टार्कने टाकल्याने हैदराबादला शंभरीपार पोहोचता आले. कमिन्स व जयदेव उनाडकट (4) यांची 23 धावांची भागीदारी सुनील नारायणने तोडली. या सामन्यातील ही दुसरी सर्वोत्तम (26 धावा, नितीश रेड्डी व एडन मार्कराम) भागीदारी ठरली. रसेलने डावातील तिसरी विकेट घेताना पॅट कमिन्सला 24 धावांवर माघारी पाठवले. हैदराबादचा संपूर्ण संघ 18.3 षटकांत 113 धावांत तंबूत परतला.

या आव्हानाचा पाठलाग करणार्‍या ‘केकेआर’ला पॅट कमिन्सने दुसर्‍याच षटकात धक्का दिला. त्याने सुनील नारायणला (6) झेलबाद करून माघारी पाठवले. मात्र, याचा अन्य फलंदाजांवर काही परिणाम झाला नाही. वेंकटेश अय्यरने तिसर्‍या षटकात 4, 6, 6, असे खणखणीत फटके खेचले. वेंकटेशने आक्रमक फटकेबाजी सुरू ठेवताना संघाला 5.1 षटकांत अर्धशतकी पल्ला गाठून दिला. वेंकटेशन आणि रहमानउल्लाह गुरबाज यांनी 45 चेंडूंत 91 धावा जोडल्या. शाहबाज अहमदच्या गोलंदाजीवर गुरबाज (39) बाद झाला. तिसर्‍या अम्पायरने पुरेशा पुराव्याअभावी गुरबाजला पायचीत बाद दिले. मैदानावर आलेल्या श्रेयस अय्यरने चौकाराने खाते उघडले. वेंकटेशने 24 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि प्ले-ऑफमधील हे त्याचे सलग तिसरे अर्धशतक ठरले. वेंकटेश 26 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांसह 52 धावांवर नाबाद राहिला आणि कोलकाताने 10.3 षटकांत 2 बाद 114 धावा करून सामना जिंकला.

Back to top button